अनुष्कासोबत सुट्या एन्जॉय करणाऱ्या विराटला चाहत्यांनी केली विनंती, म्हटले ‘आता सिरीजकडे लक्ष दे’!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 4:25 PM
सध्या विराट कोहली केपटाऊनमध्ये सुट्या एन्जॉय करीत असून, त्याचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा फोटो बघून त्याच्या चाहत्यांनी त्याला सिरीजकडे लक्ष केंद्रित करण्यास विनंती केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या हॉलिडे मूडमध्ये असून, हे दाम्पत्य सध्या केमटाऊन येथे सुट्या एन्जॉय करीत आहेत. वास्तविक हे दाम्पत्य लग्न झाल्यापासून आतापर्यंत चर्चेत आहे. त्यांचा प्रत्येक फोटो चर्चेचा विषय ठरत असून, चाहत्यांकडून त्यास पसंतीही मिळत आहे. आतापर्यंत या दाम्पत्याचे पार्टी तसेच व्हेकेशनचे बरेचसे फोटो समोर आले आहेत. या सर्व फोटोंना विरूष्काच्या चाहत्यांनी तुफान पसंती दिली आहे. परंतु आता चाहते त्यांच्या फोटोला उबगले असून, काही क्रिकेटप्रेमींनी विराटला सिरीजकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. त्याचे झाले असे की, विराटने अनुष्कासोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का बीच साइडवर रोमॅण्टिक मूडमध्ये पोझ देताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना विराटने लिहिले की, ‘केपटाऊन खूपच सुंदर ठिकाण आहे आणि अनुष्कासोबत असल्याने ते अधिकच सुंदर झाले आहे.’ विराटच्या या फोटोला त्याच्या काही क्रिकेट चाहत्यांनी कॉमेण्ट देताना त्याला आगामी सिरीजवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी तर असेही लिहिले की, विराटने अनुष्काबरोबर लग्न करून लाखो मने तोडली आहेत. दरम्यान, विरूष्काने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी केपटाऊन हे ठिकाण निवडले. याठिकाणी या दाम्पत्याची भेट बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्याशी झाली. अक्षय आणि विरूष्का एका रेस्टॉरंटमध्ये डिनरही एकत्र केल्याचे फोटो समोर आले आहेत. दरम्यान, विराट ५ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या कसोटी मालिकेत व्यस्त होणार आहे.