आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) सध्या असाच एक वाद ओढवून घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर जोरदार टीका होत आहे. तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी होतेय.आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक (Independence was bheek) होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असं कंगना एका मुलाखतीदरम्यान म्हणाली अणि तिच्यावर टीकेची झोड उठली. आता या प्रकरणी सिंगर व म्युझिक कंपोझर विशाल ददलाली (Vishal Dadlani) याचीही प्रतिक्रिया आली आहे.विशालने कंगनाचा नामोल्लेख टाळत एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. विशालने या पोस्टसोबत स्वत:चा एक फोटोही पोस्ट केला आहे. यात शहीद भगतसिंग यांचा फोटो असलेली आणि जिंदाबाद असं लिहिलेली टी-शर्ट त्याने घातली आहे.
या पोस्टमध्ये तो लिहितो, ‘स्वातंत्र्य हे भीकेत मिळालं, असं म्हणणा-या त्या महिलेला आठवण करून देतो की, माझ्या टी शर्टवर शहीद सरदार भगत सिंग आहेत. जे नास्तिक, कवी, स्वातंत्र्य सेनानी, भारतमातेचे सुपुत्र आणि भूमीपुत्र होते. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. हसत हसत आणि एक गाणं गात ते फासावर चढले. सुखदेव, राजगुरू, अशफाकउल्लाह आणि अशा हजारोंना भीक नको होती, याचे त्या महिलेला स्मरण करून द्या,जेणेकरून हे कधीही विसरण्याची तिची हिंमत होणार नाही...’
कंगनाचे स्पष्टीकरणदरम्यान संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने स्पष्टीकरण दिले होते. ‘स्वातंत्र्यासाठी पहिले संघटित युद्ध हे १८५७ मध्ये लढले गेले. मला १८५७ ची माहिती आहे पण १९४७ मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहित नाही. जर कोणी या प्रकरणावर मला माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन. कृपया मला मदत करा. राष्ट्रवादासोबत दक्षिणपंथाचा उदय झाला पण ते अचानक नष्ट कसं झालं? आणि गांधींनी भगत सिंग यांना का मरू दिलेङ्घ शेवटी, नेता सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली आणि त्यांना गांधीजींचा पाठिंबा कधीच मिळाला नाही. इंग्रजांनी विभाजन का केले? भारतीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ज्यासाठी मला मदत हवी आहे,’असं ती म्हणाली होती.
.