Vivek Agnihotri Announces The Kashmir Files Sequel : ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा प्रचंड गाजला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या चित्रपटाची चर्चा झाली. 90 च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि पलायनाच्या घटनांचे वर्णन करणाऱ्या चित्रपटाने अनेक वादही ओढवून घेतले. चित्रपटात खोटा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप झाला. याऊपरही सिनेमा बॉक्स ऑफिसवरही तुफान गाजला. केवळ 25 कोटींत तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिकची कमाई केली. आता जगभर धुमाकूळ घालणाऱ्या सिनेमाचा दुसरा पार्ट येणार आहे.
होय, ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आहे. ‘मी निराश करणार नाही, तुमची इम्युनिटी वाढवा,’ अशा आशयाचं एक ट्वीट त्यांनी केलं आहे. हे ट्वीट करताना त्यांनी शिवसेनेलाही चांगलंच डिवचलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या पार्ट 2 चं नाव ‘द दिल्ली फाइल्स’ (The Kashmir Files sequel as The Delhi Files)असणार आहे आणि हा सिनेमा 2024 मध्ये रिलीज होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’च्या सीक्वेलची घोषणा करत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘खूप साºया दहशतवादी संघटना, पाकिस्तानी लोक, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि आता शिवसेना शिवाय अर्बन नक्षलवादी देखील मला ‘द काश्मीर फाइल्स’ संदर्भात विचारत आहेत. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की, मी कुणालाच निराश करणार नाही. फक्त तुम्ही आपली इम्युनिटी वाढवायला सुरुवात करा,’असं ट्वीट विवेक अग्निहोत्रींनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आलं आहे. विवेक अग्निहोत्रींनी या ट्वीटमधून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला डिवचलं आहे. आता त्यांच्या या ट्वीटवर शिवसेना काय उत्तर देते, ते बघूच.
‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या सिनेमावरून अनेक वाद निर्माण झाले. काहींनी या सिनेमाचे कौतुक केले होते तर काहींनी टीका केली होती. हा सिनेमा समाजात फूट निर्माण करत असल्याचा आरोप झाला होता.