Join us

“वो मुझे भी नहीं छोड़ेंगे…”, सुशांत सिंग राजपूतसोबतचा फोटो पोस्ट करत विवेक अग्निहोत्रींनी केलं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 10:16 AM

Vivek Agnihotri, Sushant Singh Rajput : विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचा आणि सुशांत सिंग राजपूतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आज आपल्यात नाही. सुशांतच्या मृत्यूला दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, पण अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.  14 जून 2020 रोजी आपल्या राहत्या घरी कथितरित्या गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला होता. आता हे प्रकरण पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

होय, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करणाऱ्या टीममधील एका कर्मचाऱ्याच्या खळबळजनक खुलाशानंतर पुन्हा या प्रकरणाची चर्चा होत आहे.  सुशांतच्या पोस्टमार्टमवेळी तिथे उपस्थित असलेले  शवागार सेवक रूपकुमार शाह यांनी एक मोठा खुलासा केला आहे. सुशांतची आत्महत्या नसून ती 101 टक्के हत्याच होती, असं त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचं एक ट्वीट व्हायरल होत आहे. सुशांतला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी हे ट्वीट केलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचा आणि सुशांत सिंग राजपूतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘वो मुझे भी नहीं छोड़ेंगे... कौन थे ‘वो’, सुशांत, मेरे दोस्त?,’असं त्यांनी हा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सुशांत सिंग राजपत व राईट टू जस्टिस असे दोन हॅशटॅगही वापरले आहेत.  त्यांच्या या ट्विटवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत  आहेत. सुशांतला न्याय मिळावा म्हणून विवेक अग्निहोत्रींनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अनेक जण त्यांचं कौतुक करत आहेत. 

रूपकुमार शाह यांचा खुलासा...

‘सुशांतच्या मृतदेहावर मुका मार लागल्याच्या खूणा होत्या. हा मृतदेह आत्महत्येचा नसून हत्येचा असल्याचं वरिष्ठांना सांगितलं परंतु माझं काम मी करतो, तुझं काम तू कर, असं मला सांगण्यात आलं. माझं काम केवळ पोस्टमोर्टम करणं आणि मृतदेह शिवणं हेच होते. दीड दोन तास पोस्टमोर्टम झालं. त्याची व्हिडिओग्राफी केली नाही फक्त फोटोग्राफी केली गेली. सुशांत सिंग राजपूत हा खूप मोठा अभिनेता होता. त्याच्यासारख्या माणसाने आत्महत्या केल्यानं याकडे निरखून बघणं आमचं काम आहे. मी 28 वर्षात 50-60 मृतदेहाचं पोस्टमोर्टम केलं आहे. सुशांतचा मृतदेह पाहिल्यावर ही हत्या असल्याचं दिसलं. हातापायाला मार लागलेला माणूस गळफास लावून घेऊ शकत नाही. सुशांतने आत्महत्या केली असावी हे मला पटलं नाही.  मृत्यू संशयास्पद असल्याचं मृतदेहाच्या पोस्टमोर्टमवेळी व्हिडिओग्राफी केली जाते. सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यावेळी पूर्णवेळ मी तिथेच होतो. पोस्टमोर्टमवेळी 2 महिला आणि 3 पुरुष डॉक्टर होते. आमच्यात संभाषण झालं होतं. ही हत्या असल्याची चर्चा झाली होती. तेव्हा तुम्ही तुमचं पोस्टमोर्टमचं काम करा. आम्ही अहवाल बनवतो असं डॉक्टरांनी म्हटलं. त्याप्रमाणे आम्ही मृतदेहावर पोस्टमोर्टम केलं. जे काही नमुने होते ते पोलिसांकडे सुपूर्द केले, असं रुपकुमार शाह यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत अलीकडे सांगितलं होतं.

सुशांत सिंग राजपूत या निरापराध जीवाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे. 101 टक्के ही आत्महत्या नसून हत्याच होती. तुम्ही सुशांतचा मृतदेह निरखून पाहिला तर हे दिसून येईल. प्रत्येक माणसाला स्वत:च्या जीवाची काळजी असते. आज माझं 60 वर्ष वय आहे. माझं कुटुंब आहे. माझाही मृतदेह तिथेच आला तर काय, मी आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे. आता मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत त्यामुळे मी पुढे येऊन बोलत आहे. मी नाव घेऊन सांगू शकत नाही. पण बाहेर कुठलीही वाच्यता करू नका, असं मला सांगण्यात आलं होतं. सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळावा यासाठी मी पुढे आलोय, असंही रुपकुमार शाह यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतविवेक रंजन अग्निहोत्री