‘द काश्मीर फाईल्स’नंतर ( The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) यांनी आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं पोस्टरही रिलीज झालं आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War)असं या चित्रपटाचं नाव आहे.पोस्टरमध्ये एक लसीची शिशी दिसतेय आणि त्यावर ‘द व्हॅक्सिन वॉर’ असं लिहिलेलं आहे. हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित असल्याची माहिती विवेक अग्निहोत्री यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, हा सिनेमा हिंदी, मराठी, इंग्रजीसह एकूण 11 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.चित्रपटाच्या निर्मितीचा भार विवेक यांची पत्नी व अभिनेत्री पल्लवी जोशी सांभाळणार आहे. याशिवाय पल्लवी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतानाही दिसणार आहे. विवेक अग्निहोत्रींचा हा सिनेमा पुढील वर्षी 15ऑगस्टला रिलीज होणार आहे.
अलीकडे ‘हिंदुस्तान टाईम्स‘ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या या आगामी सिनेमाबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, ‘मी आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल यांचं Balram Bhargava’s Going Viral – Making of Covaxin: The Inside Story हे पुस्तक वाचलं. कोरोना महामारीदरम्यान लोकांनी, महिलांनी दिवसरात्र न थकता एवढ्या लसी तयार केल्या. 250 कोटी लोकांना त्या देण्यात आल्या. सामान्य लोकांना ही गोष्ट माहित नाहीये. माझ्या चित्रपटातून मी ही गोष्ट लोकांना सांगणार आहे.’ या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, निवेदिता भट्टाचार्य हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. उर्वरित 90 टक्के कलाकार हे स्थानिक कलाकार असणार आहेत. लखनौमध्ये या चित्रपटाचं शूटींग होणार आहे.विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.