हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांबद्दल बोलायचं झालं तर त्यात विवेक अग्निहोत्रीचे नाव नक्कीच येईल. 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या अफाट यशाच्या जोरावर विवेक अग्निहोत्री यांनी इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. अनेकदा विवेक अग्निहोत्री यांचं नाव नाव कोणाच्या तरी विषयासंदर्भात चर्चेचा विषय बनते. दरम्यान, बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण'च्या यशाबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
कारवाका पोडकास्टला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विवेक अग्निहोत्री यांना शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. “पठाण या चित्रपटाच्या यशाचं श्रेय शाहरूख खानला जातं. शाहरुखनं ज्या प्रकारे आपल्या चित्रपटाचं प्लॅनिंग केलं आणि मार्केटिंगची जी पद्धत अवलंबली त्याचं कौतुक करायला हवं. एक सुपरस्टार पठाण द्वारे त्यांनी हा चित्रपट आपला आहे आणि याची पूर्ण जबाबदारी आपण घेतो हे दाखवून दिलं. हीच ती गोष्ट आहे ज्यामुळे पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला आहे,” असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.
पुढे काय म्हटलंय?दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी यावर आणखी भाष्य केलं. “दुसरीकडे पठाणच्या यशाचं श्रेय बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडलाही जातं. ज्या प्रकारे शाहरुखच्या चित्रपटाचा विरोध करण्यात आला, त्यावरून चित्रपटासाठी निगेटिव्ह काहीच झालं नाही. बॉयकॉट गँगचा फासा उलटा पडला आणि पठाणला त्याचा फायदा मिळाला,” असंही ते म्हणाले.