Join us

युवराज सिंगच्या वडिलांना भोवले वादग्रस्त वक्तव्य, हातचा गमावला विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 2:24 PM

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमात योगराज सिंग यांच्या वाट्याला एक महत्त्वपूर्ण भूमिका आली होती.

ठळक मुद्देसध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात योगराज सिंग यांचे एक भाषण व्हायरल होत आहे. ते त्यामध्ये हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसले होते.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. अलीकडे योगराज सिंग शेतक-यांच्या समर्थनार्थ शेतकरी आंदोलनादरम्यान पोहोचले आणि यावेळी केलेल्या एका वक्तव्यामुळे वादात सापडले. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि तो पाहून लोक भडकले. हिंदू आणि हिंदू महिलांबद्दल त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर योगराज यांनी माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. आता तर एका सिनेमातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमात योगराज सिंग यांच्या वाट्याला एक महत्त्वपूर्ण भूमिका आली होती. या आठवड्यात या सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटींगही सुरु झाले. या सिनेमात योगराज यांची वर्णी लागली होती. मात्र आता त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर विवेक  अग्निहोत्री यांना त्यांना सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की, मी माझ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमासाठी योगराज सिंह यांना एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी कास्ट केले होते. मी यासंदर्भात त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली होती. वादग्रस्त वक्तव्यांचा त्यांचा इतिहास मला ठाऊक होता. पण मी त्याकडे कानाडोळा केला होता. कला आणि कलाकाराचे व्यक्तिगत आयुष्य याची सरमिसळ मी करत नाही. कलाकाराला मी नेहमीच राजकारणापासून दूर ठेवतो. पण त्यांच्या वादग्रस्त भाषणाबद्दल ऐकल्यानंतर मला धक्का बसला. महिलांबद्दल कोणीही असे बोललेले मी सहन करू शकत नाही. जी व्यक्त धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतेय, तिला मी माझ्या सिनेमासाठी निवडू शकत नाही. मी त्यांना याबद्दल कळवले आहे. आता ते माझ्या सिनेमात दिसणार नाहीत. 

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात योगराज सिंग यांचे एक भाषण व्हायरल होत आहे. ते त्यामध्ये हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसले होते. यानंतर अनेकांनी  त्यांच्या अटकेची मागणी केली होती.   ट्विटरवर सध्या ‘Arrest Yograj Singh’ हा हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. या वादानंतर योगराज यांनी न्यूज 18 इंडियाच्या लाईव्ह टीव्ही डिबेटमध्ये माफी मागितली होती. अनेकदा तोंडातून काही गोष्टी निघतात. नेतेही अनेकदा असे काहीबोलतात. मी जे काही बोललो त्यासाठी माफी मागतो, असे ते म्हणाले होते.

टॅग्स :युवराज सिंग