मणिपूरमधील हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. महिलांची निर्वस्त्र धिंड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. या घटनेवर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता मणिपूरमधील या घटनेवर ‘द मणिपूर फाइल्स’ चित्रपट काढण्याबाबत नेटकऱ्याने बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना थेट आव्हान दिलं आहे.
‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी ‘द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ वेब सीरिजचा ट्रेलर ट्विटरवरुन शेअर केला होता. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत “वेळ वाया घालवू नका. मर्द असाल तर मणिपूर फाइल्स चित्रपट काढा,” अशी कमेंट केली होती. नेटकऱ्याच्या या कमेंटवर अग्निहोत्रींनी उत्तर दिलं आहे. “माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. पण, सगळे चित्रपट माझ्याकडूनच बनवून घेणार का? तुमच्या ‘टीम इंडिया’मध्ये कोणी मर्द राहिलेला नाही का?” असं उत्तर अग्निहोत्रींनी दिलं आहे.
"माझ्यासोबत नसली तरीही तिच्या डोळ्यांत अश्रू...", शिव ठाकरेचं वीणा जगतापबद्दल वक्तव्य
दरम्यान, विवेक अग्निहोत्रींची ‘द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी५ वर ही वेब सीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मणिपूरमध्ये काय घडलं?
मणिपूरमध्ये कुकी समुदायातील तीन महिलांची मैतेई समुदायातील लोकांकडून छेडछाड करण्यात आली होती. ४ मे रोजी त्यांना निर्वस्त्र करुन धिंड काढण्यात आली होती. घटनेच्या २१ दिवसांनंतर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तीन महिलांना निर्वस्त्र करुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. यातील १९ वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. मणिपूरमधील या व्हायरल झालेल्या व्हिडिओची मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.