Join us

'मुंबईतील रस्ते...', विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 4:47 PM

विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे (potholes) मानसिक त्रास सहन करावा लागतो. डांबरी रस्ते उखडून खड्डे पडल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.  ते बघून हेच काय स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर, असा प्रश्न पडतो.  अनेक कलाकारांनी मुंबईतल्या खड्ड्यांबद्दल संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. आता लोकप्रिय दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri ) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील लक्झरी कार खड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जाताना दिसून येत आहेत. हाच व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहलं, "मुंबईतील रस्ते... हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा आहे. यात लेक्ससपासून क्रेटापर्यंत 20 लक्झरी कार आहेत. यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सरकार भेदभाव करू शकते. पण खड्डे मुख्यमंत्री आणि सामान्य माणूस यांच्यात भेदभाव करत नाहीत".

विवेक अग्निहोत्री यांची ही मार्मिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यापुर्वीही विवेक अग्निहोत्री यांनी BMC ला टॅग करत खड्ड्यांवरुन टीका केली होती. त्यांनी लिहलं होतं, "जर गाड्यांना खड्ड्यांपासून वाचवायचं असेल तर माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे. मुंबई नगर निगम यांनी प्रत्येक खड्ड्याच्या शेजारी एक साईनबोर्ड लावावा. त्या बोर्डवर खड्डा किती खोलीचा आहे हे सांगावं. म्हणजे हा साईनबोर्ड वाचून ड्रायव्हर त्या दृष्टीने विचार करत खड्ड्यांमधून गाडी चालवेल". याशिवाय, काही दिवसांपुर्वी विवेक अग्निहोत्रींनी लोकलचा खोळंबा झाल्याने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. 

विवेक अग्निहोत्रींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांनी 'द कश्मिर फाइल', 'द वॅक्सिन वॉर', 'द ताश्कंद फाइल्स', 'बुद्ध इन ट्रॅफिक जाम', 'मोहम्मद अँड उर्वशी' यांसारख्या अनेक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनेकदा आपल्या पोस्टमुळे ते वादात देखील सापडतात.

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीसेलिब्रिटीएकनाथ शिंदेमुंबईखड्डे