Join us

द काश्मीर फाईल्स कोणत्याही कटशिवाय रिलीज? विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 3:25 PM

द काश्मीर फाईल्सला सेन्सॉर बोर्डानं एकही कात्री न लावता सर्टिफिकेट दिल्याचा दावा

मुंबई: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा द काश्मीर फाईल्स चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. या चित्रपटामुळे वादही निर्माण झाले आहेत. द काश्मीर फाईल्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं एकही कात्री लावली नसल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखलेंनी केला आहे. गोखलेंनी चित्रपटाशी संबंधित सेन्सॉर बोर्डाच्या फाईल्सचे तपशीलही शेअर केले आहेत. आता यावर विवेक अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया दिली आहे.

साकेत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, 'सेन्सर बोर्ड/सीबीएफसीच्या फाईल्स पाहता एक गोष्ट समजली, द काश्मीर फाईल्स चित्रपटाला एकही कात्री न लावता सेन्सॉर सर्टिफिकेट देण्यात आलं. चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निहोत्रीदेखील सीबीएफसी बोर्डाचे भाग आहेत हे विशेष.' पुढील ट्विटमध्ये साकेत यांनी चित्रपटाचं कनेक्शन भाजपशी जोडलं आहे. 'भाजपशासित अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. अनेक राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी सुट्टीदेखील दिली जात आहे. हा चित्रपट एक प्रोपगेंडा आहे,' असं साकेत यांनी म्हटलं आहे. 

गोखले यांच्या ट्विटला अग्निहोत्रींनी एका लेखाचा स्क्रीनशॉट शेअर करत प्रत्युत्तर दिलं. द काश्मीर फाईल्स चित्रपट ७ कटनंतर प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती लेखामध्ये आहे. 'कृपया नेहमीप्रमाणे खोट्या बातम्या पसरवणं थांबवा. थोडा ब्रेक घ्या. किमान मृत पावलेल्या लोकांचा सन्मान ठेवा,' अशा शब्दांत अग्निहोत्रींनी गोखलेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

टॅग्स :द काश्मीर फाइल्स