बॉलिवूडमध्ये लग्नाचं वारं वाहत आहे. अनेक सेलिब्रिटी कपल्स लग्नबंधनात अडकत आहेत. कालच परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा (Raghav Chadda) यांच्याशी साखरपुडा केला. दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर काल दिल्लीत थाटामाटात साखरपुडा पार पडला. कपलचे क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर 'काश्मीर फाईल्स' चे निर्माता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचं एक ट्वीट चर्चेत आहे.
सध्या लग्न म्हणलं की चांगले फोटो आले पाहिजे यावर भर अधिक असतो. केवळ सेलिब्रिटीच नाही सामान्य जनताही फोटोंसाठी वेडी असते. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी याच विषयावर टोमणे मारणारं एक ट्वीट केलं आहे. ते लिहितात,"लग्नाचे फोटो, व्हिडिओ हवेत म्हणून सध्या लोक लग्न करत आहेत आणि डेस्टिनेशन वेडिंगचा टॅग लावत शो ऑफ करत आहेत, असं एक वेडिंग प्लॅनर म्हणाला. ते खरंही आहे, मी एका डेस्टिनेशन वेडिंगला गेलो आणि तिथे नवरीला कळलं की फोटोग्राफरला यायला उशीर आहे तर ती बेशुद्धच झाली."
विवेक अग्निहोत्री यांचं हे ट्वीट गंमतीत असलं तरी अगदी वेळ साधून परिणीतीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हे ट्वीट केले. अनेक नेटकऱ्यांनी तर त्यांच्या या ट्वीटवर सहमती दर्शवली. "विराट अनुष्काच्या लग्नानंतर हा ट्रेंड सुरु झाला पण त्यांचं लग्न प्रामाणिक होतं दिखावा नव्हता," अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली.