सध्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गँगने देशभरात खळबळ उडवली आहे. आधी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला धमक्या आल्या, सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला. याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. तर आता दोन दिवसांपूर्वीच सलमानचे जवळचे मित्र राजकारणी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या मारुन हत्या झाली. बिश्नोई गँगनेच याचीही जबाबदारी घेतली. दरम्यान बिश्नोई गँगची दहशत वाढत असतानाच अभिनेता विवेक ओबेरॉयने याआधी या बिश्नोई समाजाची स्तुती केली होती.
विवेक ओबेरॉयचा (Vivek Oberoi) जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विवेक ओबेरॉय एकदा बिश्नोई (Bishnoi) समाजाच्या एका कार्यक्रमात गेला होता. व्हिडिओत तो म्हणतो, "बिश्नोई समाजाची खूप सुंदर संस्कृती आहे. ही जगभरात पसरायला हवी. लोकांना याबद्दल समजलं पाहिजे. या समाजाचं प्रेमच असं आहे की एकदा मिळाल्यावर तुम्ही सोडू शकत नाही. मी राजस्थानातच लहानाचा मोठा झालो. माझं राजस्थानच्या मातीवर खूप प्रेम आहे. इथल्या बऱ्याच गोड आठवणी आहेत. दाल बाटी चूरमा, केर सांगरी हे सगळंच खाऊनच मोठा झालो आहे. अनेक बिश्नोई माझे मित्र, क्लासमेट राहिले आहेत. मला आतापर्यंत असंच वाटत होतं की बिश्नोई हे फक्त आडनाव आहे. पण नुकतंच मला हा एक समाज असल्याचं समजल्यावर आश्चर्य वाटलं."
तो पुढे म्हणाला, "या समाजातील लोकांनी अनेक चळवळींमध्ये बलिदान दिलं आहे त्यांना माझा सलाम. झाडांच्या बचावासाठी या समाजाने दिलेल्या बलिदानाएवढं मोठं बलिदान या जगात नाही. आम्ही जेव्हा अमृता देवी यांची गोष्ट ऐकली तेव्हा डोळ्यात आपोआपच पाणी आलं. अमृता देवी, त्यांच्या मुली यांचं बलिदान आठवल्यावर यावर सिनेमा बनायला हवा असं वाटतं."
शेवटी विवेक म्हणाला, "आपण गायीचं दूध काढून मुलांना पाजतो. या जगात बिश्नोई समाज हा एकच समुदाय आहे जिथे जर एखादं हरीण मेलं तर इथल्या माता त्या पिल्लाला छातीजवळ घेऊन त्याला दूध पाजतात आणि पोटच्या मुलासारखं सांभाळतात. हे प्रेम जगात आणखी कुठेही पाहायला मिळणार नाही."
सलमान खान आणि विवेक ओबेरॉयमध्येही जुनं वैरही आहे. ऐश्वर्या रायसोबत विवेकची जवळीक वाढल्याने सलमान खान चांगलाच संतापला होता. सलमान खाननेच विवेकचं करिअर उद्धवस्त केलं अशीही चर्चा झाली. आजपर्यंत दोघंही एकमेकांशी बोललेले नाहीत.