बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांची शौर्यकथा लवकरच रूपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 3:31 PM
आता आणखी एका सर्जिकल स्ट्राइकची शौर्यकथा पडद्यावर दिसणार आहे. होय, बालाकोट एअर स्ट्राइकवरही सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.
ठळक मुद्दे हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांत तयार होणारा हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवरचा सिनेमा आपण पाहिला. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ नावाने प्रदर्शित हा सिनेमा तुफान गाजला. आता आणखी एका सर्जिकल स्ट्राइकची शौर्यकथा पडद्यावर दिसणार आहे. होय, बालाकोट एअर स्ट्राइकवरही सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयला या चित्रपटाच्या निर्मितीचे अधिकार मिळाले आहेत.
भारतातील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. याचदरम्यान पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली होती आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. पाकिस्तानने लगेच त्यांना कैदेत घेतले होते. कैदेत असताना त्यांच्याकडून भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला होता. अभिनंदन या रिअल हिरोची हीच कथा आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘बालाकोट- ट्रू स्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव असेल.
हवाई दलाकडून निर्मितीचे अधिकार मिळाल्याने विवेक ओबेरॉय लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण चित्रपटाचे शूटींग रिअल लोकेशनवर होणार आहे. या सिनेमाची कास्ट फायनल झाली असल्याचे कळतेय. मात्र यात अभिनंदनची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांत तयार होणारा हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.