Join us

मी आजही इंडस्ट्रीत आहे...! विवेक ओबेरॉयचा सलमान खानला टोमणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 10:16 AM

२००४ मध्ये विवेक ओबेरॉयने स्वत: पत्रपरिषद घेत, सलमानबद्दल एक मोठा खुलासा केला होता. या खुलाशानंतर फिल्म इंडस्ट्रीने विवेकला काम देणे बंद केले होते. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता.

ठळक मुद्दे सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाचे कारण ऐश्वर्या राय होती.

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वैर सगळेच जाणतात. २००४ मध्ये विवेक ओबेरॉयने स्वत: पत्रपरिषद घेत, सलमानबद्दल एक मोठा खुलासा केला होता. मी आणि ऐश्वर्या सोबत आल्यानंतर सलमानकडून मला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. सलमानने रात्री नशेत मला ४२ वेळा फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा हा खुलासा होता. त्याच्या या खुलाशानंतर फिल्म इंडस्ट्रीने विवेकला काम देणे बंद केले होते. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता. अर्थात काही वर्षानंतर विवेक पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत परतला आणि आजही तो काम करतोय. हा सगळा एपिसोड सांगण्याचे कारण म्हणजे, विवेकची ताजी मुलाखत.

होय, एका ताज्या मुलाखतीत विवेक या संपूर्ण एपिसोडवर बोलला. ‘२००४ मध्ये माझ्या आयुष्यात वादळ आले.  या वादळाने माझे अख्खे आयुष्य प्रभावित केले. अर्थात इतके होऊनही आजही मी इंडस्ट्रीत टिकून आहे. भारताच्या सहा वेगवेगळ्या भाषेत मी काम केलेय. २० पेक्षा अधिक पुरस्कार जिंकलेत आणि आजही मला काम मिळतेय. बॉलिवूडमध्ये किती स्पर्धा आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण याऊपर मी अगदी शांतपणे माझे काम करतोय. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय,’ असे विवेक ओबेरॉय म्हणाला.आता विवेकचे हे ताजे वक्तव्य म्हणजे, सलमानला टोमणा आहे की आणखी काही, हे तोच जाणो. पण एक मात्र खरे सलमानसोबतचा तो एपिसोड विवेक आजही विसरला नाहीये. 

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाचे कारण ऐश्वर्या राय होती. ‘हम दिल दे चुके सनम’  च्या सेटवर सलमानचे ऐश्वर्यासोबत अफेयर सुरु होते. जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी ऐश्वर्याने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांनतर ऐश आणि विवेक यांच्यातील जवळीक वाढली. पण सलमानला ते सहन झाले नाही. याचमुळे त्याने विवेकला फोन करून शिवीगाळ केली होती. 

टॅग्स :विवेक ऑबेरॉयसलमान खानऐश्वर्या राय बच्चन