बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांच्या निधनाचे वृत्त आले आणि सगळेच हळहळले. वयाच्या 42 व्या वर्षी वाजिद यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून वाजिद आजारी होते. चेंबूरमधील सुराना रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी वाजिद खान यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. वाजिद एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व होते. बॉलिवूडमध्ये त्यांच्या या जिंदादिल स्वभावाचे अनेक किस्से सांगितले जातात. त्यांच्या याच स्वभावाचे दर्शन घडवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ रूग्णालयातील आहे. वाजिद रूग्णालयाच्या बेडवर बसून आहेत आणि आजारी असतानाही ‘दबंग’चे गाणे गात आहेत. त्याच्या चेह-यावर हास्य आहे. हे गाणे ते साजिद खानसाठी गात आहेत. रूग्णालयातील अन्य पेशंट व नर्सही त्यांच्या आजूबाजूला दिसत आहेत.हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. विरल भयानीने हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे. पण व्हिडीओ जुना असला तरी त्यांच्या चेह-यावरील हेच हास्य शेवटपर्यंत कायम होते. अडचणींवर मात करणे, संकटांना न घाबरणे हा वाजिद यांचा स्वभाव होता.अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिनेही तिच्या ट्विटमध्ये वाजिद यांच्या या स्वभावाचा उल्लेख केला आहे. वाजिद सतत हसत. त्यांचे हास्य मला नेहमी आठवत राहील, असे प्रियंकाने लिहिले आहे.
1998 मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर सलमान खानच्या गर्व, तेरे नाम, पार्टनर, दबंग यांसारख्या चित्रपटांची त्यांनी गाणी लिहिली, गायली आणि संगीतही दिले. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खानचे ‘प्यार करोना’ आणि ‘भाई भाई’ गाणेही साजिद-वाजिद जोडीने संगीतबद्ध केले होते. वाजिद यांचे ते शेवटचे गाणे ठरले.