'फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’मधील आपल्या अभिनयाने रिचा चिड्डाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सिनेमात बोल्ड भूमिका साकारणारी रिचा रिअल लाइफमध्येही तेवढीच बोल्ड आहे. बॉलिवूडमध्ये ती गेल्या काही वर्षांपासून सक्रिय असून तिने आज तिच्या अभिनयाने तिची एक ओळख मिळवली आहे. अभिनयक्षेत्रात रिचाचा कोणीही गॉडफादर नसल्याने या क्षेत्रात स्थिरावणे हे तिच्यासाठी सोपे नव्हते. पण तरीही तिने गेल्या काही वर्षांत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती शकीला या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात ती शकीला या वादग्रस्त दाक्षिणात्य अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान तिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे आणि या मुलाखती दरम्यान तिने तिचा मीटूचा अनुभव शेअर केला आहे.
रिचा चड्डा एका चित्रपटासाठी गाण्याचे चित्रीकरण करत असताना त्या चित्रपटाच्या कोरिओग्राफरने तिच्याकडे एक विचित्र मागणी केली होती. रिचाला आलेल्या या विचित्र अनुभवाबद्दल तिने मुलाखतीत सांगितले आहे की, चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी कोरिओग्राफर आम्हाला डान्स स्टेप्स शिकवत होते. त्यावेळी नृत्य करताना माझी बेंबी व्यवस्थित दिसत नव्हती. त्यामुळे कोरिओग्राफरने मला जीन्स पँट कमरेखाली करण्यास सांगितले. ते काय म्हणत आहेत हे काही सेकंद मला कळलेच नव्हते. पण नंतर माझ्या लक्षात आले की, मी नृत्याचा सराव करताना हाय वेस्ट जीन्स घातली होती आणि त्यामुळे त्यांना माझी बेंबी दिसत नव्हती. याच कारणाने त्या कोरिओग्राफरने मला जीन्स कमरे खाली घेण्यास सांगितले होते. हे ऐकल्यानंतर माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. काहीही झाले तरी मी असे काहीच करणार नाही असे मी त्या कोरिओग्राफरला ठणकावून सांगितले होते. एवढेच नव्हे तर तुम्ही बेंबी पाहाण्यासाठी मला अशाप्रकारचे कपडे घालायला सांगत असाल तर मी कपाळावर मार्करच्या साहाय्याने चिन्ह काढते, तुम्ही त्यालाच बेंबी समजा आणि पाहा असे देखील मी त्यांना सुनावले होते.