ही होती श्रीदेवी यांची अंतिम इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 6:49 AM
श्रीदेवी यांची अंतिम इच्छा त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितली होती. श्रीदेवी यांना पांढरा रंग प्रचंड आवडायचा. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अनेक ...
श्रीदेवी यांची अंतिम इच्छा त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितली होती. श्रीदेवी यांना पांढरा रंग प्रचंड आवडायचा. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटात पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंतिम संस्कारात त्यांना पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवावे असे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यामुळे त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे त्यांच्या कुटुंबियांनी ठरवले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव पांढऱ्या मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी सजवले जाणार आहे. श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले असून त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत.श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले होते.श्रीदेवी यांनी १९७८ ला सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. त्याचबरोबर, श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. Also Read : श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींची अनिल कपूरच्या घरी गर्दी!