Join us

निर्माता महेश भट्टच्या प्रयत्नांवर फिरले पाणी; सेन्सॉर बोर्डाने ‘बेगम जान’ला केले रिजेक्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 10:12 AM

काही वेळांपूर्वीच आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सेन्सार बोर्डाने स्पष्ट केले की, निर्माता महेश भट्ट आणि विद्या बालन हिची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘बेगम जान’ हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज केला जाणार नाही.

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्या प्रयत्नांवर अखेर पाणी फिरले आहे. कारण काही वेळांपूर्वीच आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सेन्सार बोर्डाने स्पष्ट केले की, निर्माता महेश भट्ट आणि विद्या बालन हिची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘बेगम जान’ हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज केला जाणार नाही. खरं तर हे अगोदरच कन्फर्म होतं की, ‘बेगम जान’ पाकिस्तानात रिलीज केला जाणार नाही, मात्र अशातही महेश भट्ट यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. कारण महेश भट्ट यांना असे वाटत होते की, पाकिस्तानबरोबर त्यांचे नाते खूपच मधुर आणि चांगले आहे. मात्र अशातही पाकने त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ दिले नाही. पाकिस्तानच्या या नकाराला सध्याची राजकीय परिस्थिती कारणीभूत असल्याचाही सूर आता व्यक्त केला जात आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘बेगम जान’ या चित्रपटात विद्या बालन अतिशय हटके भूमिकेत दिसत आहे. यात ती एका कोठ्याची मालकीण दाखविण्यात आली असून, भारत-पाकच्या सीमेवर असलेला हा कोठा हटविण्यावरूनचा संघर्ष चित्रपटात दाखविण्यात आला आहे. दरम्यान, यासर्व प्रकरणावरून महेश भट्ट यांनी ‘मिड डे’शी बोलताना म्हटले की, ‘आम्ही पाकिस्तानी फिल्म डिस्ट्रीब्यूटरला सांगितले होते की, राजकीय कारणामुळे चित्रपटावर बॅन लावणे ही काही पॉलिसी नाही. त्यामुळे तुम्ही अगोदर चित्रपट बघा त्यानंतरच बॅनचा निर्णय घ्या. मात्र अशातही त्यांनी पाकमध्ये चित्रपट दाखविण्यास नकार दिला. पाकच्या सेन्सार बोर्डाचा हा निर्णय माझ्यासाठी खरोखरच दु:खदायक आहे. वास्तविक या चित्रपटाचा कुठल्याही पॉलिटिकल डिप्लोमॅटिकशी संबंध नाही. त्यामुळेच मी पाक सरकारला चित्रपट रिलीज करण्याबाबत विनंती केली होती. मात्र सेन्सारने यास नकार दिला आहे’.दरम्यान, महेश भट्टच्या पत्रव्यवहाराला उत्तर देताना पाक सेन्सार बोर्डाने म्हटले की, पाकिस्तानमध्ये ‘बेगम जान’ रिलीज केला जाणार नाही. श्रीजीत मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीज होत आहे.