ऋषी कपूरचा कर्ज हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा, गाणी, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावला होता. या चित्रपटात ऋषी कपूर सोबत आपल्याला राज किरण या अभिनेत्याला पाहायला मिळाले होते. राज किरणने कर्ज प्रमाणेच अर्थ, घर एक मंदिर, वारिस, फासले यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. पण 1994 साली प्रदर्शित झालेल्या रिपोर्टर या चित्रपटानंतर तो कोणत्याच चित्रपटात झळकला नाही.
बॉलिवूडमध्ये काम करताना तुम्हाला यश जसे मिळते तसे अपयशाला देखील सामोरे जावे लागते. काही जणांना आपले अपयश पचवणे कठीण जाते आणि ते नैराश्यात जातात. असेच काहीसे राज किरण सोबत झाले असे म्हटले जाते. चित्रपटांमध्ये काम मिळणे कमी झाल्यानंतर राज किरणची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. डिप्रेशनवर उपचार घेताघेता त्याच्याजवळचे सगळे पैसे संपले होते. राज किरणची तब्येत खालावत असताना त्याची पत्नी रुपा मेहतानी आणि मुलगी ऋषिकाने त्याची साथ सोडली होती असे देखील म्हटले जाते. राज किरण गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहे. नैराश्यात गेल्यानंतर राज किरणला सुरुवातीला भायखळामधील मनोरुग्णांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर तो कुठे आहे, कुठल्या स्थितीत आहे, याची दखलही कुणी घेतली नाही. दशकभरानंतर काहींना जाग आली. यानंतर काहींनी राज किरणचा शोध सुरू केला. या काळात कधी त्याच्या मृत्यूची अफवा उडाली. काहींनी तो मनोरूग्णालयात असल्याचे म्हटले तर काहींनी तो न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवताना दिसल्याचा दावा केलाा. पण राज किरण कधीच परतला नाही.
‘कर्ज’मध्ये राज किरणसोबत काम करणारे ऋषी कपूर यांनीही त्याला शोधण्याचे प्रयत्न केले होते. 2011 मध्ये ऋषी कपूर राज किरणचा भाऊ गोविंद मेहतानी याला भेटले होते. त्यावेळी राज किरण अमेरिकेत अटलांटाच्या एका मनोरुग्णालयात असल्याची माहिती गोविंद यांनी ऋषी कपूर यांना दिली होते. भावाने दिलेल्या माहितीनुसार, राज किरणला पत्नीने धोका दिला. हा आघात राज किरणला सोसवला नाही आणि तो डिप्रेशनमध्ये गेला. पुढे त्याचे मानसिक संतुलन ढासळले. अर्थात राज किरणची पत्नी रूपाने हा दावा फेटाळून लावला होता.
अभिनेत्री दीप्ती नवलने देखील फेसबुक या सोशल मीडियाच्या मदतीने राज किरणला शोधण्याचा प्रयत्न केला होता. मी राज किरण या माझ्या मित्राला शोधत असून तो न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवतो असे मी ऐकले होते असे तिने अनेक वर्षांपूर्वी एका पोस्टमध्ये लिहिले होते. पण राज किरणला शोधायला या फेसबुक पोस्टचा देखील उपयोग झाला नव्हता.