Nana Patekar on Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ला बहुमत मिळाले असून, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. येत्या 9 जून रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडेल. यावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसह अभिनेत्री कंगना रणौत थप्पड कांडावरदेखील भाष्य केले.
सरकारकडे आमचे मुद्दे मांडत राहू यावेळी नाना यांनी देशातील लोकसभा निवडणूक आणि नवीन सरकारवर भाष्य केले. ते म्हणाले की, 'सरकार कोणाचेही येऊ, आम्ही आमचे मुद्दे मांडत राहणार आहोत. मी कधीच नकारात्मक विचार करत नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. देशाला मजबूत विरोधक मिळाले आहेत. सरकारने आतापर्यंत चांगले काम केले आहे, यापुढेही करत राहतील. आम्ही आमच्याकडून होईल तेवढा प्रयत्न करत आहोत.'
'सरकारदेखील चांगले काम करेल. उगाच कुणाला नाव ठेवण्यात अर्थ नाही. आम्ही सरकारला योग्य हमीभावाबाबत विचारणा करत राहू. कर्जमाफी हा पर्याय नाही, योग्य भाव मिळाल्यावर शेतकरी कर्जमाफीचा विषय काढणार नाही. शेतकऱ्यांनी शंभर रुपये खर्च केल्यावर त्यांना दीडशे रुपये मिळायला हवेत, त्यानंतर शेतकरी सरकारकडे कर्जमाफीबाबत विचारणा करणार नाही,' असंही नाना यावेळी म्हणाले.
कंगना प्रकरणावर काय म्हणाले नाना पाटेकर?अभिनेत्री आणि भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर एका महिला CISF जवानाने कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी, विवेक अग्निहोत्री, मिका सिंग, उर्फी जावेद, रनीना टंडन, विशाल ददलानी यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'मला या घटनेबद्दल फार माहिती नाही, पण असे घडले असेल, तर ते चुकीचे आहे. तसे व्हायला नको होते, चुकीची घटना घडली,' असं नाना यावेळी म्हणाले.
नेमकी काय काय घटना आहे?कंगना रणौत 6 जून रोजी चंदीगड विमानतळावर पोहोचली, यावेळी सुरक्षा तपासणीदरम्यान सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबलने तिला कानशिलात लगावली. कंगनाने शेतकरी आंदोलनावेळी दिलेल्या वक्तव्यामुळे महिला जवान नाराज होती. कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव असून, या घटनेनंतर तिला निलंबित करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.