असे काय घडले की शूटिंगदरम्यान श्रीदेवी चक्क सुपरस्टार रजनीकांतवर थुंकली?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 12:31 PM
८० आणि ९०च्या दशकात बॉलिवूडवर वर्चस्व गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी हिने यावर्षी ‘मॉम’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केले आहे. चित्रपटात ...
८० आणि ९०च्या दशकात बॉलिवूडवर वर्चस्व गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी हिने यावर्षी ‘मॉम’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केले आहे. चित्रपटात तिने एक आई आणि शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. वास्तविक श्रीदेवीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. मात्र तिची जोडी जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत प्रेक्षकांना खूपच भावली. जितेंद्रसोबतच्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटानेच श्रीदेवीला एक ओळख मिळवून दिली. श्रीदेवीने बॉलिवूड व्यतिरिक्त अनेक साउथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. आज आम्ही श्रीदेवीच्या अशाच एका साउथ चित्रपटाविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये तिला चक्क सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर थुंकायचे होते. ‘१६वयथिनिले’ असे नाव असलेला हा चित्रपट श्रीदेवीच्या कायम स्मरणात राहणारा आहे. वास्तविक या चित्रपटाच्या एका सीनमध्ये श्रीदेवीला रजनीकांतवर थुंकायचे होते. मात्र यासाठी श्रीदेवीला बरेचसे रिटेक घ्यावे लागले. अनेक रिटेक घेऊनही हा सीन परफेक्ट होत नव्हता. जेव्हा ही बाब रजनीकांत यांच्या लक्षात आली, तेव्हा ते श्रीदेवीकडे गेले. अगोदर त्यांनी श्रीदेवीला समजावून सांगितले की, ‘घाबरण्याचे काहीही कारण नाही.’ पुढे रजनीकांत यांनी श्रीदेवीला म्हटले, ‘तू पुढे येऊन माझ्यावर रिअलमध्ये थूंक, तेव्हाच सीनमध्ये परफेक्शन येईल.’ रजनीकांत यांनीच एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता. रजनीकांतने म्हटले होते की, ‘शूटिंगदरम्यान कोणीही माझ्याशी व्यवस्थित बोलत नव्हते. चित्रपटाच्या निर्मात्यांबरोबरही माझी भेट काही महिन्यांपूर्वीच झाली होती. लोकांचा असा समज होता की, हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप होईल. काहींनी तर असेही म्हटले होते की, हा चित्रपट तुझे करिअर उद््ध्वस्त करेल. मात्र जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्यास उदंड प्रतिसाद दिला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला’ असेही रजनीकांत यांनी सांगितले होते.