जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. त्यात देशातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. यासोबतच त्यांनी पीएम केअर फंडमध्ये डोनेशन देण्यासाठी लोकांना विनंती केली. हा फंड आपातकालीन परिस्थितीत व लोकांच्या कामासाठी व उपचारासाठी वापरला जातो. त्यांनी मदतीची हाक देताच उद्योगपतींसोबत बॉलिवूड व मराठी सेलिब्रेटीही पुढे सरसावले. त्यात आता बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यनने देखील एक कोटींचा मदतनिधी दिला आहे.कार्तिक आर्यनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटला आज रिप्लाय देताना म्हटलं की, या चांगल्या कार्यासाठी 1 कोटी रुपये दान देण्याचे मी वचन देतो.
तो पुढे म्हणाला की, मी आज इथंपर्यंत पोहचू शकलो ते भारतातील लोकांचे प्रेम व पाठिंब्यामुळे. लोकांच्या समर्थनानेच मी एक सुपरस्टार बनलो आहे. अशावेळी आपल्याला एका राष्ट्रात एकत्र उभे राहण्याची गरज आहे. मी आज जे काही आहे, जे काही कमविले आहे ते फक्त भारतातील लोकांमुळेच. माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे आणि मी पीएम केअर फंडसाठी 1 कोटी रुपये दान देत आहे. मी माझ्या सर्व सह भारतीयांनादेखील लागेल ती मदत करण्याची विनंती करतो.