अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. अमर अकबर एन्थोनी, खून पसिना, हेरा फेरी, रेश्मा और शेरा, मुक्कदर का सिकंदर यासांरख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांची जोडी पाहायला मिळाली. त्यांच्या दोघांतील संवादफेक, त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना प्रचंड आवडत असे. पण त्याचसोबत या दोघांमधील हाणामारीच्या दृश्यांची देखील चांगलीच चर्चा होत असे.
तुम्हाला माहीत आहे का, अमिताभ यांनी फेकून मारलेल्या ग्लासमुळे विनोद खन्ना यांच्या चेहऱ्यावर एक कायमस्वरूपी व्रण बनला होता. अमिताभ आणि विनोद एका चित्रपटाचे चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना ही घटना घडली होती. अमिताभ यांना या गोष्टीचे दुःख अनेक वर्षांपर्यंत वाटत होते. त्यांनीच याविषयी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते.
मुक्कदर का सिकंदर या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राखी आणि रेखा यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले होते. या चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी विनोद खन्ना यांच्यासोबत हा अपघात घडला होता.
या चित्रपटाच्या एका सीनमध्ये अमिताभ विनोद खन्ना यांच्यावर ग्लास फेकून मारतात आणि विनोद खन्ना ग्लासचा मारा चुकवतात असे दृश्य होते. पण चुकून तो ग्लास विनोद यांच्या चेहऱ्यावर आदळला आणि त्याच्यामुळे विनोद यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती. विनोद यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर योग्य ते उपचार देखील करण्यात आले होते. पण या दुखापतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर कायमचा व्रण राहिला. अमिताभ यांना या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटले होते. त्यांनी यासाठी विनोद यांची अनेकवेळा माफी देखील मागितली होती.