ती माझी खूप मोठी चूक होती...! जेव्हा अमिताभ मायकल जॅक्सनला कॉपी करतात...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 01:31 PM2020-12-30T13:31:30+5:302020-12-30T13:34:53+5:30
आपल्या इन्स्टा अकाऊंटवर अमिताभ यांनी ‘गंगा जमुना सरस्वती’च्या सेटवरचा एक जुना फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये बिझी आहेत. याशिवाय चित्रपट आहेतच. शिवाय सोशल मीडियाही सोबतीला आहेच. सोशल मीडियावर बिग बी कमालीचे सक्रीय आहेत. आता त्यांनी ‘गंगा जमुना सरस्वती’ या सिनेमाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. शिवाय एका चुकीची कबूलीही दिली आहे.
आपल्या इन्स्टा अकाऊंटवर अमिताभ यांनी ‘गंगा जमुना सरस्वती’च्या सेटवरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ‘गंगा जमुना सरस्वती या चित्रपटात मी मायकल जॅक्सनची कॉपी करू शकतो, असा विश्वास मनमोहन देसाई यांना होता. माझी किती मोठी चूक होती ती...’ असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.
तुम्ही ‘गंगा जमुना सरस्वती’ हा सिनेमा पाहिला असेल तर या सिनेमातील एका गाण्यात अमिताभ यांनी मायकल जॅक्सनसारखे कपडे घालून डान्स केला होता. या सिनेमात अमिताभ यांच्याशिवाय मिनाक्षी शेषाद्री, मिथुन चक्रवर्ती, जया प्रदा, अमरिश पुरी, अरूणा इराणी यांच्या भूमिका होत्या. 1988 साली रिलीज झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. पण बिग बींच्या चाहत्यांना मात्र तो फार आवडला होता. मनमोहन देसाई यांच्यासोबत अमिताभ यांनी अनेक सिनेमे केलेत. कूली, मर्द, अमर अकबर अॅन्थोनी, नसीब हे त्यापैकी काही सिनेमे.
अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ब्रह्मास्त्र, झुंज, चेहरे, मेडे हे त्यांचे आगामी सिनेमे आहेत.
माफी मागतो, पण...! ‘कोरोना’ कॉलर ट्यूनने वैतागलेल्या चाहतीला अमिताभ यांनी असे दिले उत्तर