Join us

मी मुंबईत आलो तेव्हा: अडचणी आल्या, तेव्हा समुद्राकडे पाहत बसायचो...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 5:49 AM

मी मूळचा औरंगाबादचा. मध्यमवर्गीय सुखवस्तू अशा चेतनानगर कॉलनीतला.  घरात आई-वडील, दोन्ही आजी-आजोबा सर्वच उच्च विद्याविभूषित, अगदी डॉक्टरेट केलेले.

निखिल महाजन , दिग्दर्शक

मी मूळचा औरंगाबादचा. मध्यमवर्गीय सुखवस्तू अशा चेतनानगर कॉलनीतला.  घरात आई-वडील, दोन्ही आजी-आजोबा सर्वच उच्च विद्याविभूषित, अगदी डॉक्टरेट केलेले. त्यामुळे मी मुंबईत येऊन मनोरंजन क्षेत्रात बस्तान बसवेन, असं कधी त्यांना स्वप्नातही वाटलं नसतं. माझ्या एका काकांचं त्याकाळी व्हिडीओ कॅसेटचं दुकान होतं. घरात जरी उच्च शैक्षणिक वातावरण असलं तरी सर्वांनाच चित्रपट पाहण्याची भारी आवड होती. माझे आजोबा तर उत्तम स्टोरी टेलर होते. ते मला शेक्सपिअरच्या गोष्टी समजावून सांगायचे. तसे सगळेच गोष्टी वेल्हाळ. त्याचा कदाचित लहानपणापासूनच माझ्यावर नकळत परिणाम होत गेला असावा. आई इंजिनिअर असल्याने मीही इंजिनिअरिंगसाठी  बारामतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. २००३ साल होतं ते. त्यावेळी नुकतंच कुठे इंटरनेट नामक मोहजालाचा जन्म झाला होता.

राम गोपाळ वर्माच्या  कंपनीने नवोदित लेखकांकडून कथा मागवल्या होत्या. मीही तीन कथा त्यांच्यासाठी लिहिल्या, पाठवल्या आणि विसरून गेलो. २००५मध्ये मुंबईत आलो असताना त्यांच्या ऑफिसला भेट दिली, तेव्हा कळलं त्यातली एक गोष्ट त्यांना आवडली होती आणि त्यांनी मला त्याच्यावर काम करायला सांगितलं. हे सर्व इंजिनिअरिंग करता करता बरं. मुंबई आणि बारामती अशी माझी धावपळ होत होती. प्रॅक्टिकल्स बुडत होती, अभ्यासावर परिणाम होत होता. शेवटी मुंबईत येऊन ह्याच क्षेत्रात काम करण्याचं मनोमन नक्की केलं. आईला अर्थातच ते मान्य नव्हतं. इथे माझे आजोबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.  पण त्यांनी मला एक अट घातली. जे क्षेत्र निवडलं त्याचं व्यवस्थित शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊनच काम सुरू करायचं. मग मी ऑस्ट्रेलियाला जाऊन यातलं शिक्षण घेतलं आणि २०१० साली उमेदवारी करायला मुंबईत दाखल झालो.  अंधेरीच्या शेर ए पंजाब कॉलनीत एका मित्राकडे काही वर्ष राहिलो.       

मुंबईत आल्यावर उदरनिर्वाहासाठी पैसे कमावण्याचं दडपण होतं. इन-एंटरटेनमेंट या कंपनीत मी स्क्रिप्ट सुपरव्हायझर म्हणून रुजू तर झालो पण त्याचबरोबर ‘पुणे - ५२’ या कथेवरही चित्रपटासाठी कामाला सुरूवात केली. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटापासून येत्या आठवड्यात प्रदर्शित होत असलेल्या ‘गोदावरी’ चित्रपटापर्यंतच्या प्रवासात मला मुंबईने खूप काही शिकवलं. ह्या सर्व प्रवासात जेव्हा-जेव्हा अडचणी आल्या, मी बँड स्टॅण्ड किंवा जुहूच्या समुद्रावर जाऊन तासनतास त्या अथांग सागराकडे बघत बसलो आणि माझे प्रश्न सुटले.       - शब्दांकन : तुषार श्रोत्री