कपिल शर्मा (Kapil Sharma) हे नाव सध्याच्या घडीला कोणालाही नवीन नाही. कपिल जितका त्याच्या विनोदांमुळे चर्चेत येतो तितकाच त्याच्या वादग्रस्त आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून कलाविश्वात पदार्पण करणारा हा अभिनेता आज विनोदवीर म्हणून ओळखला जातो. कपिलने द कपिल शर्मा शो या व्यतिरिक्त काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र, त्याचे हे चित्रपट फारसे यशस्वी ठरले नाहीत. विशेष म्हणजे एकेकाळी कपिल शर्माला गदर चित्रपटात काम करायची संधी मिळाली होती. मात्र, या सेटवरुन त्याला धक्के मारुन बाहेर काढण्यात आलं.
सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गदर' या चित्रपटाचं अमृतसरमध्ये चित्रीकरण सुरु होतं. त्यामुळे ही शूटिंग पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत कपिल शर्मादेखील होता. चित्रपटाच्या सेटवर गेल्यानंतर चित्रपटात एखादी लहान भूमिका मिळेल या आशेने तो गेला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी टीनू वर्मा यांनी त्याला कानशिलात लगावली. याविषयी टीनू शर्मा यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं.
"चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना लोकांनी तेथे खूप गर्दी केली होती. यावेळी मी अॅक्शन म्हटलं की सगळ्यांनी ट्रेनच्या दिशेने धाव घ्यायची असं सांगितलं. त्यानुसार, मी अॅक्शन म्हटल्यावर सगळे गाडीच्या दिशेने धावू लागले. फक्त कपिल विरुद्ध दिशेने धावत होता. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नव्हता कपिल होता. कपिलच्या या वेडेपणामुळे हा सीन योग्यरित्या शूट झाला नाही", असं टिनू शर्मा म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "मी कपिलला असं करु नकोस असं दोन वेळा सांगितलं. मात्र, सीन सुरु झाल्यावर परत तो उलट्या दिशेने पळाला. त्यामुळे मी रागाच्या भरात त्याच्या कानशिलात लगावली आणि त्याला सेटवरुन बाहेर काढलं."
दरम्यान, कपिल शर्मा आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. द कपिल शर्मा या त्याच्या रिअॅलिटी शोमधून त्याने मोठी प्रसिद्ध मिळवली आहे. तसंच तो काही चित्रपटांमध्येही झळकला. मात्र, हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.