बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) खान तिच्या जबरदस्त अॅटिट्यूड आणि कॉन्फिडन्समुळे कायम चर्चेत येत असते. फक्त रुपेरी पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही तिचा स्वभाव असाच बिनधास्त आहे. त्यामुळे ती कायम चर्चेत येत असते. सध्या करीना तिच्या एका जुन्या व्हिडीओमुळे चर्चेत येत आहे. एका कार्यक्रमात करीनाने अभिनेत्री राणी मुखर्जी (rani mukharji) आणि ट्विंकल खन्ना (twinkle khanna) यांच्यासोबत फोटो काढण्यास नकार दिला होता. या नकारामागचं कारण तिने ट्विंकलच्या पॉडकास्टमध्ये दिलं आहे. हाच व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
सध्या सोशल मीडियावर करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकलसोबत बोलत असताना तिने तिच्या आणि राणीसोबत फोटो काढण्यास नकार का दिला होता यामागचं कारण सांगितलं आहे.
"तू याच पिढीमधील आहेस असं सतत तू सांगायचा प्रयत्न करतेस. मला चांगलं आठवतंय की, अलिकडेच तू राणी मुखर्जी आणि माझ्यासोबत फोटो काढण्यास नकार दिला होता", असं ट्विंकल करीनाला म्हणाली. त्यावर, करीनाने त्यामागचं कारण सांगितलं.
काय म्हणाली करीना?
"हो. बरोबर आहे. कारण, मी त्या पिढीमधली नाहीये. मग मी कशाला उगाच त्या पिढीत स्वत:ला टाकायचा प्रयत्न करु. मी करणला सांगितलं लोलो (करिश्मा कपूर) हिला या फोटोत असायला हवं, असं करीना म्हणाली. त्यावर, आम्ही तुझ्यापेक्षा दोन पिढ्या आधी आहोत. त्यामुळे तू कायमच तरुण राहशील काळजी करु नकोस", असं ट्विंकल म्हणाली.
दरम्यान, करीनाने २००० साली वयाच्या १९ व्या वर्षी रिफ्यूजी सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. अलिकडेच ती क्रू या सिनेमात झळकली. या सिनेमात तिच्यासोबत तब्बू आणि कृती सेनॉन यांनी स्क्रीन शेअर केली आहे.