तू तुझ्या मुलाला विकू शकत नाही...; सैफवर जाम भडकली होती करिना कपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 08:00 AM2021-07-21T08:00:00+5:302021-07-21T08:00:02+5:30
छोटा भाऊ आल्यानंतरही तैमूरची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. साहजिकच त्याची ही लोकप्रियता ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला.
सैफ अली खान (Saif Ali Khan) व करिना कपूर खानचा ( Kareena Kapoor) मुलगा तैमुर अली खानचे ( Taimur) स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वा-याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. छोटा भाऊ आल्यानंतरही तैमूरची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. साहजिकच त्याची ही लोकप्रियता ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला.
तैमूरनं आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करावे, त्यानं आपली जाहिरात करावी, अशी इच्छा अनेक निर्मात्यांना झाली. अनेकांनी तैमूरला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेऊन येण्याचा सल्ला सैफला दिला होता. पण तैमूरची मम्मी यासाठी कधीही तयार झाली नाही. लेकाची अफाट लोकप्रियता बघता त्याला प्रमोशनसाठी घेऊन जाण्यास सैफ तयार होता. पण इतना भी चीप मत बनो, असे म्हणत बेबोने सैफला चांगलेच सुनावले होते. खुद्द सैफने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
2018 मध्ये सैफने आर जे सिद्धार्थ कननला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तो बोलला होता. तो म्हणाला होता की, ‘मी ज्या कोणत्या निर्मात्यांसोबत काम केले त्या प्रत्येकाने मला तैमूरला प्रमोशनच्या वेळी घेऊन येण्याचा सल्ला दिला होता. बाजार आणि कालाकांडी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तर काही भन्नाट कल्पना सुचवल्या होत्या. कालाकांडीसाठी ते तैमूरला रबर बँड घालू इच्छित होते. त्याला नागा साधूचा विग घालू इच्छित होते. सेटवर निर्माते तैमूरच्या नावावरून गमती गमतीत अशा अनेक कल्पना मला सांगायचे. एकदा मी सुद्धा करिनाला असंच काही बोलून गेलो होतो. तैमूरला डायपरची चांगली जाहिरात मिळाली तर आपण विचार करू, असे मी तिला म्हणालो होतो. त्यावर ती माझ्यावर चांगलीच संतापली होती. तू तुझ्या मुलाला विकू शकतं नाही, अशा कडक शब्दांत तिने मला सुनावले होते.
आता तैमूरचा लहान भाऊ जेह हा सुद्धा चर्चेत आहे. अद्याप त्याचा चेहरा जगापुढे आलेला नाही. पण तैमूर इतकीच त्याचीही चर्चा होताना दिसतेय.