हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि बडे कुटुंब म्हणजे भट्ट कुटुंबीय. हिंदी चित्रपटसृष्टीत भट्ट कुटुंब कायमच चर्चेत असतं. भट्ट कुटुंबीयांच्या सिनेमांची ही खास बात असते. महेश भट्ट हे बॉलीवुडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक. आजवर अनेक हिट सिनेमा भट्ट कॅम्पने दिले आहेत. सिनेमांसह विविध गोष्टींमुळे भट्ट कुटुंब कायमच चर्चेत असते.
कॉलेजमध्ये असताना महेश भट्ट यांनी वयाच्या विसाव्या वर्षी लोरिएन ब्राईट नावाच्या तरुणीशी लग्न केलं होतं. लग्नानंतर महेश भट्ट यांनी लोरिएनचं नाव किरण भट्ट असं केलं. महेश आणि किरण यांची दोन मुलं आहेत. एक पूजा भट्ट आणि दुसरा राहुल भट्ट. यानंतर महेश भट्ट यांचे सोनी राजदान यांच्याशी सूत जुळले. सोनी राजदानशी लग्न करण्यासाठी महेश भट्ट यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. महेश आणि सोनी राजदान यांच्या दोन लेकी असून एकीचं नाव शाहिन तर दुसरीचे नाव आलिया भट्ट असं आहे. महेश भट्ट आणि सोनी रझदान यांचे लग्न आता तीस वर्षाहूनही अधिक काळ झाला आहे.
दोन लग्न केल्यामुळे महेश भट्ट यांचे वैवाहिक आयुष्यातही अनेक घडामोडी सुरू असायच्या. सिमी गरेवालच्या शोमध्ये महेश भट्ट यांनीच त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयीचे अनेक खुलासे केले होते. पूजा भट्ट १० वर्षाची असतानाच महेश भट्ट यांनी त्यांच्या दुस-या प्रेमाविषयी सांगितले होते. तिच्यापासून त्यांनी कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. सुरूवातीला पूजा आणि मुलगा राहूलमध्ये तीव्र नाराजी होती. कोणीतरी त्यांच्या वडिलांना त्यांच्यापासून हिरावत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली होती.
त्याच शोमध्ये सोनी रझदाननेही दुस-या लग्नाबाबत अनेक खुलासे केले होते. महेश भट्टला डेट करत असताना किरणशी तिचे जोरदार भांडणही झाले असल्याचे सांगितले होते. मात्र महेश भट्ट यांच्यासह लग्न केल्यानंतर सोनी रझदान आणि किरण यांच्यात थोड्याफार प्रमाणात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. किरण ही खूप चांगली आई आहे. पूजा आणि राहूलला किरणचा उत्तम सांभाळ केला असल्याचेही सोनी रझदानने सांगितले होते.