ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस असून प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचे ते पूत्र आहेत. वडिलांमुळे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणे त्यांच्यासाठी सोपे होते. त्यांनी मेरा नाम जोकर या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर काहीच वर्षांनी बॉबी या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनीच त्यांना लाँच केले. बॉबी या त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले. त्यानंतर ऋषी यांनी बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले. ऋषी कपूर यांना त्यांच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.
ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नितू सिंग कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. १९७३ ते १९८१ या काळातच त्यांनी १२ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अनेक वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी २२ जानेवारी १९८० मध्ये लग्न केले. नितू सिंग यांनी लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. त्या दोघांना रणबीर आणि रिधिमा अशी दोन मुले आहेत. रणबीर देखील आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे.
ऋषी कपूर आणि नितू सिंग सध्या अनेक पार्टींमध्ये, कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळतात. त्यांनी दोघांनी गेल्या १० वर्षांत काही चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, नव्वदीच्या दशकात ऋषी आणि नितू यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. ऋषी यांना दारूचे प्रचंड व्यसन होते आणि मद्यधुंद अवस्थेत ते नीतू यांना मारहाण करतात अशा बातम्या त्या काळात मीडियात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर नितू सिंग यांनी ऋषी यांच्याविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रारही नोंदवली होती. त्यानंतर नितू आणि ऋषी वेगळे देखील राहात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या दरम्यान नितू यांनी पैसे कमवण्यासाठी एक सलून देखील सुरू केले होते. पण कालांतराने त्या दोघांमध्ये सगळे काही सुरळीत झाले.