Join us  

जेव्हा रणबीर बनला संजूबाबा !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 12:29 PM

बॉलीवुडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त.संजय दत्तच्या आयुष्यात ब-याच घडामोडी घडल्या आहेत. संजूबाबाचं कमी वयात ड्रग्सच्या आहारी जाणं, त्यातून बाहेर ...

बॉलीवुडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त.संजय दत्तच्या आयुष्यात ब-याच घडामोडी घडल्या आहेत. संजूबाबाचं कमी वयात ड्रग्सच्या आहारी जाणं, त्यातून बाहेर येण्याचा त्याचा प्रवास, मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारावास भोगणं असो किंवा मग त्याचं खासगी आयुष्य. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट म्हणजे जणू काही सिनेमाच्या कथेत घडणा-या घडामोडी. त्यामुळेच की काय बॉलीवुडला मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स असे एकाहून एक दर्जेदार सिनेमा देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी संजय दत्तच्या याच आयुष्यावर सिनेमा बनवत आहेत. याच सिनेमात संजय दत्तची भूमिका बॉलीवुडचा रॉकस्टार म्हणजेच अभिनेता रणबीर कपूर ही भूमिका साकारत आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरु असून रणबीर त्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनतसुद्धा घेतो आहे. नुकतंच रणबीर कपूरला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017 सोहळ्यात आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर ( (पुरुष कॅटेगरी)  पुरस्काराने गौरवण्यात आलं.या निमित्ताने रणबीर या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होता. याच खास क्षणाचं औचित्य साधत लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी रणबीर कपूरची प्रकट मुलाखत घेतली. रणबीरला त्यांनी यावेळी विविध प्रश्न विचारले. त्याची रणबीरनंही दिलखुलास उत्तरंसुद्धा दिली. रणबीर तिथं असताना त्याच्या संजय दत्तवरील सिनेमाचा विषय निघणार नाही असं कसं होईल. संजय दत्तच्या जीवनावरील सिनेमा आणि त्याच्या भूमिकेविषयी ऋषी दर्डा यांनी रणबीरला विचारलं. त्यावेळी ऋषी दर्डा यांनी रणबीरला संजय दत्तचा वॉक करुन दाखवण्याची आणि त्याचा एखादा डायलॉग बोलून दाखवण्यासही सांगितले. संजय दत्तच्या चालण्याच्या शैलीचे सगळेच फॅन आहेत. त्यामुळे रणबीरनं मोठ्या खिलाडूवृत्तीने संजूबाबाचा प्रसिद्ध वॉक करुन उपस्थितांची मनं जिंकली. रणबीर यावरच थांबला नाही तर संजय दत्त बोलतो कसा हेसुद्धा रणबीरनं दाखवून दिलं. संजय दत्तसारखा वॉक करता करता करता त्यानं संजय दत्तच्या खास स्टाईलमध्ये कसं काय येरवडा असा डायलॉग म्हटला. त्यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं.