ऋषी कपूर यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. जवळपास वर्षभर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परंतु त्यांची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी ठरली. आज सकाळी मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरं होण्यासाठी काही काळ लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यादरम्यान त्यांना एका गोष्टीची चिंता सतावत होती ती म्हणजे, या आजारातून बरं झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा अभिनय करायचा होता. ठणठणीत बरं झाल्यानंतर मला काम मिळेल का, भूमिका मिळतील का, ही चिंता त्यांना सतावत होती. रणबीर कपूरने एका पुरस्कार सोहळ्यात त्यांची ही चिंता बोलून दाखवली होती. दरम्यान ऋषी कपूर सोशल मीडियावर आपले विचार मांडताना दिसले.पण अभिनयापासून लांबच राहिले. डॉक्टरांनी त्यांनी सक्त विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता.
याकाळात पत्नी नीतू, मुलगी रिद्धिमा आणि मुलगा रणबीर कपूर सावलीसारखे त्यांच्यासोबत होते. रिद्धिमाचा सुखाचा संसार ऋषी कपूर पाहत होतेच. पण रणबीरचे लग्न पाहण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. अखेर त्यांची ही ईच्छासुद्धा अपूर्णच राहिली.