दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. रतन टाटांच्या निधनाने सामान्य माणासांपासून उद्योगपती ते कलाकारांपर्यंत सर्वांनी हळहळ व्यक्त केली. रतन टाटा यांचा मनोरंजन विश्वातील कलाकारांशी चांगलाच संबंध होता. अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांचीही मैत्री खूप चांगली होती. अशातच KBC 16 च्या मंचावर अमिताभ यांनी रतन टाटांकडे काही पैसे मागितल्याचा खास किस्सा सांगितला.
अमिताभ यांनी सांगितला रतन टाटांचा खास किस्सा
अमिताभ यांनी KBC 16 च्या मंचावर फराह खान आणि बोमन इराणी यांना हा खास किस्सा सांगितला. अमिताभ म्हणाले, "रतन टाटा खूप साधे-सरळ व्यक्ती होते. मला आठवतंय की, आम्ही एकत्र एका फ्लाईटमधून प्रवास करत होतो. पुढे हिथ्रो एअरपोर्टवर आम्ही उतरलो. रतन टाटांना जी माणसं घ्यायला आली होती ती माणसं कदाचित निघून गेली असतील. टाटांना ती माणसं दिसली नाहीत. म्हणून ते फोन बूथकडे जायला निघाले. त्यावेळी मला विश्वास बसत नाही अजून. ते मला म्हणाले, अमिताभ मला काही रुपये उधार देऊ शकतोस का?" अशाप्रकारे अमिताभ यांनी भारावून टाकणारा किस्सा सांगितला.
रतन टाटांनी अमिताभ यांच्या सिनेमाची केलेली निर्मिती
रतन टाटांचं भारतीय उद्योगविश्वातील योगदान फार मोठं आहे. टाटा समूहाची जगभरात ओळख निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. उद्योगविश्वाला नवा दृष्टिकोन देणाऱ्या टाटांनी बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेतली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमासाठी टाटा निर्माते झाले होते. २००४ साली अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू मुख्य भूमिकेत असलेला 'ऐतबार' हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता.
या सिनेमाचे रतन टाटा सहनिर्माते होते. पण, बॉक्स ऑफिसवर अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा फार चांगली कामगिरी करू शकला नाही. ९.५० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने केवळ ७.९६ कोटी कमावले. या सिनेमामुळे रतन टाटा यांचं फार मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे त्यांनी बॉलिवूडमधून काढता पाय घेतला. यानंतर रतन टाटांनी कुठल्याही सिनेमाची निर्मिती केली नाही.