Join us

सेटवर आलेल्या 11 वर्षाच्या मुलाला रवीना टंडनने हाकलून दिले होते तोच मुलगा आहे आज बॉलिवूडचा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 1:21 PM

THROWBACK : हा किस्सा आहे 1994 सालचा. रवीना टंडन त्यावेळी ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्याचे शूटींग करत होती....

ठळक मुद्देरवीना तिच्या जागी अगदी योग्य होती. पण रणवीर आजही रवीनाला भेटला की, या घटनेचा न चुकता उल्लेख करतो. अर्थात गमतीने.

रवीना टंडन (Raveena Tandon) 90 च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री. आजही तिच्यासाठी चाहते क्रेझी आहेत. पण तूर्तास आम्ही रवीनाबद्दल नाही तर तिने सेटवरून हाकलून लावलेल्या एका पोराची गोष्ट सांगणार आहोत. होय, 11 वर्षांचे ते बारकं पोर रवीनाच्या सेटवर शूटींग पाहायला आलं होतं. पण रवीनाने निर्मात्याला सांगून त्या पोराला सेटवरून हुसकावून लावलं होतं. तेच पोरं पुढे बॉलिवूडचा सुपरस्टार झालं. होय, त्याचं नाव काय तर रणवीर सिंग  (Ranveer Singh) .

बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी रणवीरला बराच संघर्ष करावा लागला. अगदी थिएटरमध्ये बॅकस्टेजवर  कलाकारांसाठी चहा आणण्यापासून तर त्यांच्यासाठी खुर्च्या लावण्यापर्यंतचे पडेल ते काम त्याने केले. पण 2010 मध्ये आदित्य चोप्राने रणवीरला ब्रेक दिला आणि रणवीरचा पहिलाच चित्रपट ‘बँड बाजा बारात’ सुपरहिट झाला. यानंतर रणवीरने कधीच मागे वळून पाहिले नाही. याच रणवीरला कधीकाळी रवीना टंडनने सेटवरून हाकलून लावले होते. होय, कॉफी विद करण या शोमध्ये खुद्द रणवीरने हा किस्सा ऐकवला होता.

हा किस्सा आहे 1994 सालचा. रवीना टंडन त्यावेळी ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पानी’  या गाण्याचे शूटींग करत होती. रणवीर या गाण्याच्या सेटवर हजर होता. पण त्यावेळी रणवीर केवळ 11 वर्षांचा होता. रणवीरला सेटवर पाहून रवीनाला काहीसे अवघडल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे तिने लगेच निर्मात्यांना सांगून रणवीरला सेटवरून बाहेर काढले.

रवीनाने असे का केले, याचा खुलासाही नंतर झाला होता. रवीनाने स्वत: याबद्दल सांगितले होते. होय, मी रणवीरला सेटवरून हाकलले होते. कारण त्यावेळी ‘टीप टीप बरसा पानी’ गाण्याचे शूटींग सुरु होते आणि हे गाणे प्रचंड सेन्शुअल होते. रणवीर तेव्हा खूप लहान होता. मुलांनी असे सेन्शुअल गाणे शूट होताना पाहू नये, असे माझे मत होते. त्यामुळे आईवडिलांना राहू द्या पण लहान मुलांना बाहेर काढा, असे मी निर्मात्यांना सांगितले होते. मुलांनी वयाच्या हिशेबाने योग्य तेच पहावे, हे माझे मत आहे आणि आत्ताही मी या मतावर ठाम आहे, असे रवीना म्हणाली होती.रवीना तिच्या जागी अगदी योग्य होती. पण रणवीर आजही रवीनाला भेटला की, या घटनेचा न चुकता उल्लेख करतो. अर्थात गमतीने.

टॅग्स :रवीना टंडनरणवीर सिंग