आपल्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावामुळे अभिनेता सलमान खान (salman khan) कायमच चर्चेत असतो. त्यामुळे बऱ्याचदा त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या वादविवादाची चर्चा रंगते. परंतु, सध्या सलमान एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात चक्क सलमानची फसवणूक झाली असून एका मुलाखतीत त्याने याविषयी भाष्य केलं आहे.
यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २७ एप्रिल रोजी पार पडणार असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. या निमित्ताने अलिकडेच त्याने एका आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हजेरी लावली. यावेळी बोलत असताना पूर्वी एकदा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात माझी फसवणूक करण्यात आल्याचं त्याने सांगितलं.
"मला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. तसंच मला पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असंही सांगितलं होतं. त्यामुळे मी माझ्या वडिलांसोबत आणि कुटुंबियांसोबत या सोहळ्याला गेलो. परंतु, तेथे गेल्यावर काही वेगळंच चित्र होतं. पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केल्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता सलमान खानला… अशी घोषणा करण्यात आली. त्यानुसार मी जागेवर उभा राहून पुरस्कार घ्यायला जाणार, तोच माझं नाव मध्येच थांबवून जॅकी श्रॉफ यांचं नाव घेण्यात आलं आणि त्यांना पुरस्कार देण्यात आला. या प्रकारामुळे मी चक्रावून गेलो. इतकंच नाही तर हे काय चाललंय असं मला वडिलांनीही विचारलं", असं सलमान खान म्हणाला.
पुढे तो म्हणतो, “ त्या सोहळ्यात मला परफॉर्मन्सही करायला सांगितलं होतं. मात्र, घडलेल्या प्रकारानंतर मी परफॉर्म करणार नाही असं ठामपणे सांगितलं. त्यावर तुला परफॉर्म करायला मी मोठी रक्कम देईन असं सांगण्यात आलं. यावर ठरलेल्या रक्कमेच्या ५ पट जास्त किंमत मी मागितली. ही किंमत संबंधित व्यक्तीने देण्यासही तयारी दर्शवली. मात्र, घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करायची नाही ही अट ठेवली. त्यावर 'तू चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला आहेस', असं म्हणत मी तेथून निघालो.
दरम्यान, हा किस्सा १९९० साली रंगलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात घडला होता. या सोहळ्यात जॅकी श्रॉफ यांनी परिंदा या सिनेमातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.