जेव्हा संजय दत्त कारागृहात होता तेव्हा मान्यता मुलांसोबत रोजच बोलायची खोटं!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 4:02 PM
बॉलिवूडचा सर्वांत जास्त कॉन्ट्रोर्व्हशियल कलाकार म्हणून संजय दत्तला ओळखले जाते. कारण त्याचे नाव अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेले असून, गेल्या काही ...
बॉलिवूडचा सर्वांत जास्त कॉन्ट्रोर्व्हशियल कलाकार म्हणून संजय दत्तला ओळखले जाते. कारण त्याचे नाव अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेले असून, गेल्या काही काळापर्यंतचा त्याचा प्रवास खूपच वादग्रस्त असा राहिला आहे. अर्थात काही गोष्टी त्याच्या आयुष्यात चांगल्याही घडल्या आहेत. कारण त्याच्या आयुष्यात कितीही नकारात्मक प्रसंग आले असले तरी, त्याने त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कधीच त्याचा त्रास होऊ दिला नाही. जेव्हा तो कारागृहात शिक्षा भोगत होता, तेव्हाही त्याने आपल्या आप्तस्वकीयांना याचा त्रास होऊ दिला नाही. विशेषत: आपल्या मुलांना त्याने कधी याबाबतची जाणीव होऊ दिली नाही. कारागृहात असतानाही तो त्यांची काळजी घेत होता. त्याने पत्नी मान्यताला आदेशच दिले होते की, कधीही मुलांना घेऊन जेलमध्ये येऊ नकोस. परंतु यामुळे मुलांच्या निरागस प्रश्नांचा ज्या पद्धतीने मान्यताने सामना केला तेही कौतुकास्पदच म्हणावे लागेल. होय, मान्यताला मुलांपासून पप्पा कुठे आहेत, हे लपवून ठेवण्यासाठी खोटं बोलावं लागत असे. जेव्हा संजय दत्तने मान्यता मुलांना याविषयी काहीही सांगू नकोस, असे सांगितले तेव्हा तिनेदेखील पत्नीचे कर्तव्य बजावित मुलांचा सांभाळ केलाच शिवाय संजूबाबाच्या प्रत्येक संकटाचा तेवढ्यात धिराने सामनाही केला. मान्यताला तिचे चिमुकले नेहमीच विचारायचे की, ‘पप्पा कुठे गेले?’ तेव्हा ती काहीतरी उत्तर देऊन त्यांची समजूत काढत असे. त्यातही एक उत्तर ठरलेले असायचे ते म्हणजे ‘पप्पा शूटिंगला गेले आहेत.’ संजूबाबाचे मुलेदेखील पप्पा लवकर येतील या आशेवर आपल्या विश्वात दंग व्हायचे. परंतु मान्यताला संजय दत्त कारागृहाच्या बाहेर येईपर्यंत मुलांसोबत हे खोटं बोलावं लागलं. जरा विचार करा की, ऐवढे वर्ष चिमुकल्या मनाची समजूत काढणे मान्यताला किती अवघड गेले असेल. कारण जेव्हा संजय दत्त कारागृहात होता तेव्हा मान्यताला परिवाराला सांभाळणे एक आव्हान होते. अर्थातच तिने हे आव्हान पेलले. तिने परिवार तर सांभाळलाच शिवाय संजय दत्तच्या आॅफिसची जबाबदारीही सांभाळली. याबाबतचा खुलासा स्वत: संजय दत्त यानेच सुधीर चौधरीला दिलेल्या एका मुलाखतीत केला.