शाहरुख खानने अभिनयाच्या जोरावर कोणचाही गॉड फादर नसताना बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. अनेक सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. अपार मेहनत आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शाहरुख बॉलिवूडचाही किंग आहे. शाहरुखने १९९१ साली गौरीबरोबर लग्न करत संसार थाटला. पहिल्याच नजरेत गौरीने शाहरुखच्या काळजात घर केलं होतं. परंतु, हिंदू असलेल्या गौरीच्या कुटुंबीयांचा या आंतरधर्मीय विवाहास विरोध होता. पण, ऐकेल तो शाहरुख कसला!
चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या किंग खानने गौरीच्या आईवडिलांचीही मनं जिंकत लग्नासाठी होकार मिळवला. हिंदू पद्धतीनेच त्यांचं लग्न झालं होतं. शाहरुखने एका मुलाखतीत लग्नानंतरचा एक खास किस्सा सांगितला होता. शाहरुखने त्याच्या सासरच्या मंडळींबरोबर प्रँक केला होता.शाहरुख मुस्लीम असल्यामुळे नातेवाईक अनेक गोष्टी बोलायचे. लग्नानंतर शाहरुख गौरीचं नाव बदलेल. मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव आणेल, असं गौरीच्या नातेवाईकांकडून बोललं जायचं. या सगळ्यांना शाहरुखने चोख उत्तर द्यायचं ठरवलं होतं.
लग्नानंतर रिसेप्शनवेळी शाहरुख सगळ्यांसमोरच गौरीला म्हणाला, "चल गौरी उठ. गौरी बुरखा घाल आणि नमाज पठण कर. तुझं नाव बदलून आयशा करू. तू नमाज पठण करशील आणि घरातून बाहेर पडणार नाहीस." शाहरुख असं म्हणाल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर त्याने हा प्रँक असल्याचं सांगितलं होतं.