Bollywood vs South Cinema: बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता, असं म्हणत साऊथ सुपरस्टार महेश बाबूनं (Mahesh Babu) नव्या चर्चेला तोंड फोडलं. महेश बाबूच्या या वक्तव्यावर बॉलिवूडकरांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या वक्तव्यासाठी महेश बाबूचं समर्थन केलं आहे तर काहींनी त्याला फटकारलं आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. होय, व्हिडीओ एका जुन्या मुलाखतीचा आहे. महेशबाबूला जो प्रश्न विचारला गेला, तसाच काहीसा प्रश्न या मुलाखतीत किंगखानला विचारला गेला होता. यावर शाहरूखनं सुंदर उत्तर दिलं आहे.
बॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दल अलीकडे महेश बाबूला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, बॉलिवूड मला अफोर्ड करू शकत नाही. मला अफोर्ड न करू शकणाऱ्या इंडस्ट्रीत काम करून मी माझा वेळ फुकट का वाया घालवू, असं महेश बाबू म्हणाला होता. शाहरूख खानला असाच हॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दल प्रश्न केला गेला होता. मात्र त्यावर त्यानं काहीसं विनोदी उत्तर दिलं होतं. त्याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. प्रश्नाचं उत्तर कसं देतात, हे महेशबाबूनं शाहरूखकडून शिकायला हवं, असं म्हणत नेटकरी हा जुना व्हिडीओ शेअर करत आहेत.
तर हा व्हिडीओ 2008चा आहे. शाहरूख बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गेला असता एका पत्रकार परिषदेत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. तू बॉलिवूडचा इतका मोठा स्टार आहेस, मग हॉलिवूडबद्दल काही विचार केला आहेस की नाही? असा तो प्रश्न होता. यावर शाहरूखने मजेशीर उत्तर दिलं होतं.
‘माझं इंग्लिश फार चांगलं नाही. हॉलिवूडमध्ये विना डायलॉगचा रोल असेल तर तो मी नक्कीच करू शकतो. मी 42 वर्षांचा आहे. थोडा ब्राऊन आहे. एक अभिनेता म्हणून माझा काहीही युएसपी नाही. माझ्यात काहीही खास नाही. मला कुंग फू येत नाही. मी लॅटिन सालसा डान्स करू शकत नाही. माझी उंचीही कमी आहे. हॉलिवूडला तुम्ही ड्रिम फॅक्ट्री म्हणत आहात. पण माझ्या मते, तिथे माझ्यासाठी कोणतीही जागा नाही. माझ्या मते, मी तितका टॅलेंटेड नाही. त्यामुळे मी भारतीय चित्रपटातच काम करू इच्छितो आणि आशा करतो की, मी भारतीय सिनेमाला जगभर ओळख मिळवून देईल. हाच माझा उद्देश आहे,’असं उत्तर शाहरूखने दिलं होतं.
‘मी दीर्घकाळापासून काम करतोय. लोकांनी भारतीय सिनेमे बघावे, अशी माझी इच्छा आहे. मी ज्याठिकाणी काम करतोय, तिथे माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. जिथे हिंदी सिनेमे लोकप्रिय नाहीत, अशा ठिकाणी मी हिंदी सिनेमा पोहोचवू इच्छितो,’असंही तो म्हणाला होता.हॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार देण्याचा शाहरूखचा हा अंदाज सध्या तरी लोकांना चांगलाच भावला आहे. महेश बाबूनं शाहरूखकडून शिकावं, असं लोक म्हणत आहेत, ते त्याचमुळे.