Join us

'तू घरी जा आणि इडल्याच विक..'; समिक्षकांनी सुनील शेट्टीला दिला होता खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 09:23 IST

Suniel shetty: एक काळ असा होता ज्यावेळी त्याच्या अभिनयाची खिल्ली उडवली गेली होती. अभिनेत्रींनीही त्याच्याकडे पाठ फिरवली होती.

आपल्या दमदार अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी (Suniel shetty).  उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर सुनीलने बॉलिवूडमध्ये त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्याचे असंख्य सिनेमे सुपरहिट झाले. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी त्याच्या अभिनयाची खिल्ली उडवली गेली होती. इतकंच नाही तर कोणतीही अभिनेत्री त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हती. अगदी काही समिक्षकांनी त्याला हिनवलंही होतं. ‘बार्बरशॉप विथ शंतनू’ या पॉडकास्टमध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याची ही मुलाखत सध्या चर्चिली जात आहे.

"ज्यावेळी माझा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला त्यावेळी सर्वात नावाजलेल्या एका समीक्षकाने मला चांगलंच हिनवलं होतं. याने पुन्हा इडल्या विकल्या पाहिजेत अशा शब्दांत त्याने माझ्या सिनेमाचं परिक्षण केलं होतं. तो सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. प्रेक्षकांनीही मला अॅक्शन हिरो म्हणून स्वीकारलं होतं. पण एक मोठं मीडिया हाऊस मला पुन्हा माघारी जायला सांगत होते. त्यावेळी हे जे चाललंय ते योग्य नाही असंच मला वाटत होतं", असं सुनील शेट्टी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मी अभिनयाचं कोणतंही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. तरीदेखील त्यांनी माझ्या भुमिकेची तुलना शाळेत बालनाट्यामध्ये असलेल्या झाडाशी केली होती. खरं तर त्यांना एवढं वाईट लिहायची काहीच गरज नव्हती. पण, त्यानंतर हे क्षेत्र स्थिर नसल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मग मी इतर व्यवसाय करायला सुरुवात केली. जेणेकरुन जर उद्या काम मिळणं बंद झालं तरी आपल्याकडे एक बॅकअप असेल." 

सुनीलचं नाव ऐकून अभिनेत्रीही द्यायच्या नकार

सुरुवातीच्या काळात सुनीलला त्याच्या लूकवरुनही जज करण्यात आलं होतं. अनेक अभिनेत्रींनी केवळ त्याच्या लूक्सकडे पाहून सिनेमासाठी नकार दिला होता. त्यानंतर सुनीलने स्वत:च्या पर्सनालिटीवर लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या करिअरचा आलेख उंचावू लागला. सुनीलने त्याच्या करिअरमध्ये ११० सिनेमांमध्ये काम केलं. मोहरा, कृष्णा, गोपी किशन, रक्षक, सपूत, बॉर्डर, धड़कन, मैं हूं ना आणि हेरा फेरी असे कितीतरी सुपरहिट सिनेमा त्याने दिले.

दरम्यान,  सुनील शेट्टीने वयाच्या ३१ व्या वर्षी 'बलवान' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात त्याच्यासोबत दिव्या भारतीने स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमानंतर सुनील अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकला. आजही सुनीलच्या अभिनयाची आणि फिटनेसची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. 

टॅग्स :सुनील शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटी