करण जोहर 48 वर्षांचा असला तरी त्याने आजही लग्न केले नाही. त्याने एक निर्माता-दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, करणचे एकेकाळी एका अभिनेत्रीवर प्रचंड प्रेम होते आणि त्यानेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये कबूल देखील केली होती.
करण जोहरचे अभिनेत्री ट्विंकल खन्नावर प्रचंड प्रेम होते. ट्विंकल ही अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आहे.ट्विंकल आणि करण हे लहानपणापासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ते दोघे एकाच शाळेत शिकत होते. करणला ट्विंकल खूप आवडायची आणि त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे होते. ही गोष्ट अक्षय कुमारला देखील माहीत असून यावरून त्याने कॉफी विथ करण या कार्यक्रमात करणची टर देखील उडवली होती.
कुछ कुछ होता है या करणच्या पहिल्या चित्रपटात टीना ही भूमिका ट्विंकल खन्नाने साकारावी असे करणला वाटत होते. पण ट्विंकलने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे ट्विंकलला सगळे टीना या नावानेच हाक मारत असल्याने त्याने या चित्रपटातील नायिकेचे नाव टीना ठेवले होते.
राज कपूर, यश चोप्रा, सुरज बडजात्या यांच्या कामाचा करणवर खूपच प्रभाव आहे. त्याने यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्राकडे दिलवाले दुल्हनिया ये जाएंगे या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिथेच तो चित्रपट निर्मितीतील अनेक बारकावे शिकला आणि कुछ कुछ होता है या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या दिग्दर्शकीय करियरला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्याला पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली.