आज दिल्लीत सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जात आहेत. या वर्षी २४ ऑगस्ट रोजी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील अनेक दिग्गज कलाकार विजेत्यांच्या यादीत आहेत. त्यानंतर आज मंगळवारी (१७ ऑक्टोबर) नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहेत. हा पुरस्कार सोहळा तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता. हा सोहळा कधी, कुठे पाहता येईल हे आज आपण जाणून घेऊयात..
यंदा बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’, क्रिती सेनॉनला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर अल्लू अर्जुनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. 'आरआरआर' या चित्रपटाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. रॉकेट्री - द नम्बी इफेक्ट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' हा मराठी सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात येणार आहे.
भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली. हा पुरस्कार सोहळा भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून आयोजित केला जातो. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.