बॉलिवूडच्या इतिहासात असे काही कलाकार आहेत ज्यांनी खलनायिकी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. विशेष म्हणजे या कलाकारांच्या निगेटिव्ह भूमिकेलाही प्रेक्षकांनी उचलून धरलं. त्यामुळेच आज मोगॅम्बो, शाकाल, गब्बर या भूमिका अजरामर झाल्या. या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना कलाविश्वात आज एक हक्काचं आणि स्वतंत्र स्थान आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे दिपक शिर्के (deepak shirke). मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये खलनायिकी भूमिका साकारून दिपक शिर्के विशेष प्रसिद्ध झाले. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच दिपक शिर्के आता काय करतात ते पाहुयात.
1993 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'तिरंगा' या चित्रपटात दिपक शिर्के यांनी प्रलयनाथ गेंडास्वामी ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटामुळे कलाविश्वात त्यांची एक वेगळीच नवीन निर्माण झाली. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये खलनायिकी भूमिका साकारल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे अण्णा शेट्टी. 'अग्निपथ'मध्ये त्यांनी साकारलेली ही भूमिका चांगलीच गाजली.
अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये केलंय दिपक शिर्केंनी काम
'तिरंगा'व्यतिरिक्त दिपक शिर्के 'हम', 'इश्क', 'गुंडा' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच 'धडाकेबाज', 'झपाटलेला' २,‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘घनचक्कर’, ‘अफलातून’, ‘शेम टू शेम’, ‘अबोली’, ‘रात्र आरंभ’, ‘मराठा बटालियन’, ‘व्हेंटिलेटर' या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे. विशेष म्हणजे १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत.
कुठे गायब झाले दिपक शिर्के?
'अग्निपथ' या चित्रपटात दिपक शिर्के यांनी अण्णा शेट्टी ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवली. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असून सर्व स्तरांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. परंतु, आता दिपक शिर्के यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. २०१९ मध्ये एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या 'पांडू' चित्रपटात ते झळकले होते. त्यानंतर अलिकडेच त्यांचा २०२१ मध्ये 'ब्लॅक मार्केट' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, आता त्यांचा कलाविश्वातील वावर बऱ्यापैकी कमी झाला आहे.