हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणजे हरीश पटेल (Harish Patel). दमदार अभिनयशैलीच्या जोरावर हरीश यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं. नाटकांपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याने बॉलिवूडसह अमेरिकन चित्रपट, मालिकांमध्येही काम केलं आहे. वयाच्या ७ व्या वर्षापासून त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. परंतु, आता कलाविश्वातून ते अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे ते कुठे आहेत? काय करतात हा प्रश्न चाहत्यांना पडतो.
१९८३ साली श्याम बेनेगल यांच्या 'मंडी' सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 'मिस्टर इंडिया', 'गुंडा', 'जब प्यार किसीसे होता हैं', 'प्यार तो होना ही था' अशा कितीतरी सिनेमांमध्ये ते झळकले होते. परंतु, सध्या ते कुठे आहेत हा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. विशेष म्हणजे हरीश पटेल यांनी बॉलिवूडला रामराम केल्यानंतर ते हॉलिवूडकडे वळले आहेत.
हरीश यांच्या अनेक भूमिका गाजल्या. मात्र, मिथुन चक्रवर्तीच्या गुंडा' या सिनेमातील त्यांची भूमिका विशेष गाजली. या सिनेमात त्यांनी इबू हटेला ही भूमिका साकारली होती. यात त्यांचा डायलॉग आजही चर्चेत येतो. 'मैं हूं इबू हटेला, मां मेरी शैतान की बेटी, बाप मेरा शैतान का चेला' असा त्यांचा संवाद गाजला होता. हरीश यांनी १९९४ ते २००८ पर्यंत बॉलिवूडमध्ये कार्यरत होते. पण काम करत असताना अचानकपणे ते गायब झाले. दरम्यान, मध्यंतरी ते मार्वलच्या 'इटर्नल्स'मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले होते. त्यामुळे सध्या ते हॉलिवूडमध्येच काम करत असल्याचं म्हटलं जातं.