बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे राज किरण (Raj Kiran). 'बुलंदी' 'कर्ज', 'घर हो तो ऐसा', 'तेरी मेहरानबनिया' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा त्याने बॉलिवूडला दिले. त्यामुळे त्याने 80 चं दशक चांगलंच गाजवलं. परंतु, एकेकाळी सिनेसृष्टी गाजवणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात एकाकी पडला. त्याच्या पडत्या काळात कुटुंबानेही त्याची साथ सोडली. गेल्या १९ वर्षांपासून राज किरण कुठे आहेत, काय करतायेत याचा कोणालाच ठावठिकाणा नाही.
राज किरण यांचे सिनेमा गाजत असताना त्यांच्या भोवती नातेवाईकांचा, चाहत्यांचा गराडा होता. मात्र, ज्यावेळी त्यांनी कलाविश्वातील वावर कमी केला. तेव्हापासून त्यांच्यापासून माणसं दुरावली. विशेष म्हणजे कलाविश्वाती लोकांनीही त्यांच्याशी असलेले संबंध तोडले. या पडत्या काळात त्यांना कुटुंबाची जास्त गरज होती. मात्र, कुटुंबानेही त्यांची साथ सोडली असं म्हटलं जातं.
राज किरण यांच्या करिअरमध्ये चढउतार येत असतानाच ते डिप्रेशनमध्ये गेले होते. याच काळात त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांचा विश्वासघात केला. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी अभिनेत्री दिप्ती नवल यांनी राज किरण यांनी अमेरिकेमध्ये टॅक्सी चालवताना पाहिलं होतं. इतकंच नाही तर २०११ मध्ये दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनाही राज किरण यांची माहिती मिळाली होती. परंतु, त्या माहितीनुसार, राज किरण अमेरिकेतील मनोरुग्णालयात होते असं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, राज किरण यांचं खरं नाव राज किरण मेहतानी असं असून त्यांनी १०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात त्यांनी सहाय्यक अभिनेत्यासह मुख्य अभिनेता म्हणूनही अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. १९९४ साली शेखर सुमनच्या एका कार्यक्रमात राज किरण दिसले होते. त्याच्यानंतर ते कुठेही दिसले नाहीत. त्यांच्या पत्नीच्या सांगण्यानुसार, राज किरण अनेक वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे बॉलिवूडवर राज्य करणारा हा अभिनेता आता कुठे आहे? काय करतोय? हे कोणालाही ठावूक नाही.