दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, ‘केदारनाथ’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांना कदाचित या चित्रपटासाठी २०१९ ची प्रतीक्षा करावी लागू शकते.बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट यंदा रिलीज करण्याऐवजी पुढीलवर्षी रिलीज करण्याचा विचार मेकर्सनी चालवला आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक कपूर यांनी स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर ‘केदारनाथ’ची रिलीज डेट जाहिर केली होती. त्यानुसार, येत्या ३० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिचा हा डेब्यू चित्रपट पाहण्यासाठी लोक उत्सूक होते. पण आता बॉक्सआॅफिसवरचा क्लॅश टाळण्यासाठी ‘केदारनाथ’ची रिलीज डेट लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे. ‘केदारनाथ’ येत्या ३० नोव्हेंबरला रिलीज झालाच तर त्याची थेट टक्कर अक्षय कुमार व रजनीकांत यांच्या ‘2.0’ शी होणार आहे. कारण ‘2.0’ हा चित्रपटही नोव्हेंबरच्या अखेरिस प्रदर्शित होतो आहे. ‘केदारनाथ’च्या मेकर्सला बॉक्सआॅफिसवरचा हा पंगा नको आहे.‘केदारनाथ’च्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकलेच तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा सारा अली खानचा डेब्यू सिनेमा ठरेल. ‘सिम्बा’च्या शूटींगचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण झाले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग व सारा अली खान ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
सुरुवातीपासूनच ‘केदारनाथ’च्या मार्गात एक ना अनेक अडचणी येत होत्या. आधी हवामानामुळे या चित्रपटाचे शूटींग रखडले होते. नंतर या चित्रपटातील लीड हिरो सुशांत सिंग राजपूत याच्या मूड स्विंगमुळे चित्रपटाचे शूटींग लांबल्याची चर्चा झाली होती. यापश्चात ‘केदारनाथ’मधील महाप्रलयाचा सीन मुंबईत रिक्रिएट करण्याचा निर्णय झाल्याने शूटींग लांबले होते आणि ऐनवेळी निर्माता आणि दिग्दर्शकामधील वादामुळे या सिनेमाचे शूटींग थांबले होते. तिकडे डेब्यू सिनेमा असा रखडल्याने साराची चिंताही मात्र वाढली होती. केवळ साराचं नाही तर तिचे डॅड सैफ अली खान आणि आई अमृता सिंह हे सुद्धा टेन्शनमध्ये आले होते.