Join us

सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारताना राजकुमार राव गेला धूम्रपानाच्या आहारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 3:59 PM

भूमिकेत अधिक जिवंतपणा आणण्यासाठी राजकुमारने सिगारेट पिण्यास सुरुवात केली. आता तो सिगारेटच्या आहारी गेला आहे.

अभिनेता राजकुमार राव एएलटी बालाजी यांच्या ‘बोस डेड/अलाव्ह’ या वेब सीरिजमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारत आहे. राजकुमार कुठलीही भूमिका साकारताना त्यात बेस्ट शेप आणि लुक्स आणणे पसंत करतो. या भूमिकेसाठी त्याने अशीच काहीशी मेहनत घेतली आहे. त्यासाठी तो गेल्या कित्येक दिवसांपासून डायटवर असल्याचे समजते. शिवाय त्याने अर्धे टक्कलही केले आहे, जेणेकरून सुभाषचंद्र बोस यांच्या लूकशी साध्यर्म साधले जावे. त्याचबरोबर तो या भूमिकेसाठी एका व्यसनाच्या आहारी गेला आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. परंतु संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुमच्याही ही बाब लक्षात येईल. सुभाषचंद्र बोस यांना धूम्रपानाची सवय होती. सिगारेट पिण्यासाठी त्यांना ओळखले जायचे. राजकुमारनेही भूमिकेत अधिक जिवंतपणा आणण्यासाठी सिगारेट पिण्यास सुरुवात केली. परंतु तो सिगारेटच्या चांगलाच आहारी गेला आहे. धूम्रपानाने त्याने या भूमिकेत जिवंतपणा आणला, मात्र त्याचे त्याला आता व्यसन जडले आहे. पिंकविला या इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, याविषयी बोलताना या प्रोजेक्टच्या क्रिएटीव्ह प्रोड्युसरने सांगितले की, ‘मला हे बघून खूपच आश्चर्य वाटले की, लडाखमध्ये शूटिंगदरम्यान राजकुमार रावला श्वास घेण्यात अडचण येत होती. तसेच यापेक्षाही मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी राजकुमारने स्मोकिंगचे व्यसन लावून घेतले. पुढे बोलताना क्रिएटीव्ह प्रोड्युसरने म्हटले की, वास्तविक राजकुमारला कुठलीच वाईट सवय नाही. त्याची फिट लोकांमध्ये गणती केली जाते. तो हेल्दी जेवण करतो, झोपही चांगली घेतो. मात्र सुभाषचंद्र बोस यांना पडद्यावर साकारण्यासाठी त्याने स्वत:ला व्यसनाच्या आहारी केले आहे. या भूमिकेसाठी राजकुमारने ११ किलो वजन वाढविले आहे. ही सीरिज देशातील सर्वात मोठ्या प्रश्नाच्या अवतीभोवती फिरणारी आहे. वेबसीरिजमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा नेताजी बनण्यापर्यंतचा प्रवास आणि ते देशातील सर्वात लोकप्रिय नेते कसे बनले याविषयी दाखविण्यात येणार आहे. या सीरिजच्या ट्रेलरमध्ये नेताजींचे प्रसिद्ध घोषवाक्य ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दुंगा’ याचा समावेश करण्यात आला आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांची लडाई दाखविण्यात आली आहे.