अक्षय कुमार बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. दरवर्षी तीन ते चार चित्रपट करणारा अक्षय सध्या जोरात आहे. नुकताच अक्षयचा ‘गोल्ड’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली. लवकरच अक्षयकुमार ‘केसरी’, ‘2.0’,‘हाऊसफुल4’ या चित्रपटांत दिसणार आहे. अक्षय कुमारचे खरे नाव आहे, राजीव भाटिया. आपल्यापैकी बहुतेकांना हे ठाऊक आहेच. दिलीप कुमार (युसूफ खान), बॉबी देओल ‘विजय सिंग देओल’, सनी देओल (अजय सिंग देओल), संजीव कुमार (हरीभाई झरीवाला) यांसारखेच अक्षयनेही आपले खरे नाव बदलवून अक्षय कुमार हे आॅनस्क्रीन नाव धारण केले. पण त्याने हे नाव का निवडले, हे तुम्हाला ठाऊक आहे? तर यामागेही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
होय, १९८७ मध्ये आलेल्या महेश भट्ट दिग्दर्शित ‘आज’ या चित्रपटात अक्षय कुमारचा केवळ १५ सेकंदाचा रोल होता. राज बब्बर, स्मिता पाटील, राज किरण, कुमार गौरव अशा या मल्टिस्टारर चित्रपटात अक्षयने कराटे प्रशिक्षकाची अगदी लहानशी भूमिका केली होती. या चित्रपटात कुमार गौरवने अक्षय नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. हे नाव बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ला इतके आवडले की त्याने हेच आॅनस्क्रीन नाव धारण करण्याचा निर्णय घेतला आणि राजीव भाटियाचा अक्षय कुमार झाला. विशेष म्हणजे, नाव बदलण्याचा हा निर्णय अक्षय कुमारच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कारण नाव बदल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अक्षयला त्याचा पहिला चित्रपट मिळाला. खुद्द अक्षयनेचं एका मुलाखतीत हे सांगितले होते. नाव बदलण्याचा निर्णय मी कुण्याही ज्योतिष्याच्या वा गुरूच्या सांगण्यावरून घेतला नव्हता. सहज म्हणून मी नाव बदलले. पण यानंतर माझी भरभराट सुरू झाली. हा योगायोग म्हणा किंवा चमत्कार, असे अक्षय म्हणाला होता.‘सौगंध’ या चित्रपटापासून अक्षयने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. अर्थात हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. १९९२ मध्ये अक्षयने करिअरमधला पहिला हिट ‘खिलाडी’ दिला आणि मग त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.