वूडी अॅलनच्या सिनेमात त्याच्या नायकाच्या तोंडी एक वाक्य आहे. माझ्या बाबांनी आत्महत्या केली कारण त्यांना रोज सकाळी माध्यमांत येणारी बातमी खूपच उदास करत होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने वूडी अॅलनच्या सिनेमातील या वाक्यावर पुन्हा विचार करण्याची गरज आता भासू लागली आहे. सुशांतने आत्महत्या केल्याने ग्लॅमर जगतातील ताणतणाव,नैराश्य हे मुददे प्रकर्षाने समोर येऊ लागले आहेत. याआधीही अनेक तारे-तारकांनी आपलं जीवन अश्याचप्रकारे संपवलं आहे. मात्र नैराश्येच्या खोलात जाऊन हे पाऊल उचलणं कितपत योग्य यावर नुसत्या चर्चा करणं योग्य नसून त्यावर इलाज काय ह्यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. अचानक तरुणवयात झालेले मृत्यू यांना जसं गूढ वलय आहे तसंच एक विचित्र समीकरण त्याच्याशी जोडलं गेलंय आणि ते ही ग्लॅमरचं. पण माणूस जेव्हा जगण्याची इच्छा असूनही जगणं शक्य नाही वाटून आत्महत्या करतो तेव्हा आपल्याला या समाजात डोकावून बघावंसं वाटतं. मग ती सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या असो किंवा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या यांना आत्महत्या म्हणायचं की खून असाच प्रश्न आता विचार करताना पडायला लागला आहे. समाज अथवा समाजातले घटक माणसाचं जगणं इतकं नामुश्कीचं किंवा अवघड करून ठेवतात की एखाद्याला जगायला आवडत असतानादेखील मरून जावंसं वाटतं.चित्रपटसृष्टीत किंवा ग्लॅमरच्या विश्वात अशा अनेक आत्महत्या घडतात. कधी स्पर्धेमुळे तर कधी अपयश न पेलता आल्याने. कधी प्रेमात आलेलं अपयश तर कधी आपण या स्पर्धेत टिकून राहू की नाही या अनिश्चितीमुळे हेच ग्लॅमर जगातील स्टार मृत्यूला कवटाळतात आणि तेही अगदी सहजपणे असं का होतं याकडे बारकाईने विचार करण्याची वेळ आली आहे.सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने अनेक प्रश्नांनी डोक्यात खेळ मांडायला सुरवात केली आहे. नैराश्य,विफलता अशी कारणं जरी पुढे येत असतील तरी कधीकधी खरी परिस्थिती वेगळी असूही शकते. ग्लॅमर जगतातल्या लोकांचं आयुष्य हे सतत भिंगाखाली बघितलं जात असतं. या ग्लॅमरच्या क्षेत्रात येण्यास करावं लागणारं स्ट्रगल , एकदा का हे ग्लॅमर मिळालं की ते कायम ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड यासाठी हे स्टार जीवाचं रानही करतात. यात या क्षेत्रात आलेल्या अपयशाच्या बातम्या चवीने चघळल्याही जातात. आणि ह्याचा थोडाबहुत का होईना परिणाम या स्टार्सच्या मनावर होत असतो. आज आपल्या सामान्य, साध्यासुध्या आयुष्यातही आपल्याला नानाविध अडचणी असतात. तर या स्टार्सच्या आयुष्यात या अडचणींचा करियरच्या टप्प्याटप्यांवर जणू डोंगरच असतो. सोशल मिडियाच्या अवास्तव महत्वतेमुळे स्टार्सच्या खासगी जीवनात सामान्य माणूसही इतका शिरला आहे की नेमकं हे यश टिकवायचं कसं किंवा आपण काही चुकीचं वागलो तर त्याचे पडसाद कसे उमटतील या विवंचनेत अडकणाऱ्या मानसिक अवस्थेकडे पाहायला मुळातच कोणाला वेळ नाहीये. दुसरी गोष्ट या ग्लॅमरच्या जगात आज प्रचंड लोकप्रिय असणारा स्टार उद्या तितकाच लोकप्रिय असेल की नाही याची कोणतीही शाश्वती नाही. लोकप्रियतेचा कळस गाठल्यानंतर राहणीमानात आलेला बदल आणि आपण स्टार आहोत ही मुळात आलेली भावना अपयशाच्या गर्तेत अडकल्यानंतर अधिक विखारी होते. आपण करिअरच्या वाटेवर घेतलेले निर्णय , चुकीची किंवा बरोबर होत असलेली टीका, त्यात एखादं आलेलं अयशस्वी प्रेमप्रकरण याचा स्टारच्या मनावर थोड्याबहुत का होईना परिणाम घडत असतो. मात्र या निराशेतून जरी त्याला किंवा तिला बाहेर पडण्याची ताकद मिळत असेल. तर अशी अनेक माध्यमं त्याला किंवा तिला हे विसरायला भाग पाडत नाहीत. आणि सततची होत असणारी ही नकारात्मक चर्चा ग्लॅमरच्या या मोहमयी क्षेत्रात इतकी मारक ठरते की एकतर तो प्रवाहातून लांब तरी फेकला जातो किंवा नवनवीन वादांचा कायम बळी ठरत राहतो.नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा सध्याच्या काळात प्रामुख्याने आढळून येणारा गंभीर आजार. आपल्या बदलेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा नैराश्य आपल्याला ग्रासून टाकते. ग्लॅमर जगाताशी या शब्दाचा अगदी जवळचा संबंध आहे. स्वत:बद्दल आत्मविश्वास राहिला नसून सतत इतरांनी मला पसंत करावं किंवा माझी स्तुती करावी असं वाटत राहण्याचं प्रमाणही या ग्लॅमर क्षेत्रात पाहायला मिळतं . सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत हीच बाब जास्त प्रकर्षाने पाहायला मिळत आहे. आपल्या अत्यंत खाजगी गोष्टी शेअर करता येतील असं कोणी आजूबाजूला राहतच नसावं. आणि हे सगळं जर बाहेर आलं तर आपल्याबद्दल कोण कसा विचार करेल याची शाश्वती नसल्याने आत्महत्येचं पाऊल उचलण्याआधी हे सगळे विचार त्याच्याही मनात येणं साहजिक आहे. याला कारणीभूत आहे ते या ग्लॅमर क्षेत्रातील स्पर्धा आणि करिअरमधील चढउतार.आज नातेसंबंधांमध्ये मोकळीक आली आहे असं आपण म्हणतो. नातेसंबंध त्यामुळे अधिक प्रगल्भ होताना दिसायला हवेत. पण असं काही दिसत तर नाहीये उलट हे नातेसंबंध जास्त ताणले गेले आहेत. यात मुळात ग्लॅमरच्या या युगात तुमच्या जवळ आलेली व्यक्तीही मानसिकरित्या आयुष्याच्या टप्प्यावर तुमचं खच्चीकरण करू शकते. अशावेळी केवळ प्रेम अथवा नातेसंबंधांच्या आदर्श कल्पनांना बळी पडतात आणि काहीही झालं तरी ते टिकवणं महत्वाचं आहे याच्या मागे लागतात. एक जीव हकनाक गेलेला असतो, चुकीच्या गृहीतकावर गुदमरून त्याने त्याचा कोंडमारा केलेला असतो. मात्र आता सुशांत सिंह राजपूतच्या या उदाहरणानंतर ग्लॅमर क्षेत्रातील ही अनिश्चितता , विसंवाद,कोंडमारा यावर खुलेपणाने बोलण्याची गरज निर्माण झाली आहे. विसंवादाकाडे झुकणाऱ्या या नैराश्याला संवादाने सुसह्यतेचा रस्ता धरणे योग्य असेल. आणि याला आपणही बहुतांशी जबाबदार आहोत त्यामुळे याची जाणीव आपल्यापासूनच करून घेण्याची सुरवात आपणही करून घेणार आहोत का कधी ..हा मूळ प्रश्न आहे.