लेख: हा पडला, तो आपटला!.. बॉलिवूडला नेमकं झालंय काय?, कुठे चुकतंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 09:55 AM2022-08-21T09:55:38+5:302022-08-21T10:17:42+5:30
सिनेमा निर्माण करण्यासाठी प्रतिभेची जितकी आवश्यकता तितकेच महत्त्व त्यासाठी लागणाऱ्या पैशाचे. निर्मात्याने भांडवल म्हणून उभा केलेला पैसा त्याला परत मिळणे हे देखील गरजेचे.
- डॉ. संतोष पाठारे
सिनेसृष्टीत सध्या एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. बिग बजेट सिनेमे आले. दिग्गज कलाकारही झळकले. पण बॉक्स ऑफीसवर सर्व मोठे सिनेमे जोरदार आपटले. 'लालसिंग चढ्ढा' असो किंवा मग 'समशेरा', 'भुलभुलैय्या-2' अन् 'बच्चन पांडे' इत्यादी. या सर्व बॉलीवूडपटांना बॉक्स ऑफीसवर मोठा फटका बसला. दुसरीकडे 'पुष्पा', 'RRR' सारख्या दाक्षिणात्य सिनेमांच्या कमाईची एक्स्प्रेस सुस्साट धावली. बॉलीवूड सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आता चित्रपटगृहांकडे पाठ का फिरवत आहे? यामागची नेमकी कारणं काय आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
सिनेमा नेमका कोणाचा? लेखकाचा, दिग्दर्शकाचा, निर्मात्याचा, तंत्रज्ञाचा, अभिनेत्याचा की प्रेक्षकांचा? १८९५ साली जन्माला आलेल्या सिनेमा माध्यमाची मालकी कोणाची? खरं तर ही कला सर्वांचीच, समूहाची!
कविता, गायन, चित्र , शिल्प या कलांवर केवळ एक कलाकार आपली मालकी सांगू शकेल पण सिनेमाचे तसे नाही. एखाद्या संकल्पनेवर पटकथा रचणारा लेखक, त्याला आपल्या सर्जनशीलतेने दृश्याची भाषा देणारा दिग्दर्शक, दिग्दर्शकाला अभिप्रेत असणारा भाव पडद्यावर साकारण्यासाठी मेहनत घेणारे अभिनेते व तंत्रज्ञ आणि या सर्वाना आर्थिक पाठबळ पुरवणारा निर्माता या साखळीतील अंतिम कडी म्हणजे या सिनेमाला प्रतिसाद देणारा प्रेक्षक!
सिनेमा निर्माण करण्यासाठी प्रतिभेची जितकी आवश्यकता तितकेच महत्त्व त्यासाठी लागणाऱ्या पैशाचे. निर्मात्याने भांडवल म्हणून उभा केलेला पैसा त्याला परत मिळणे हे देखील गरजेचे. या गरजेतून सिनेमाला व्यावसायिक रूप आले.तिकीट खरेदी करून चित्रपटगृहात चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकाची अभिरुची निर्मात्यांना महत्त्वाची वाटू लागली. प्रेक्षकांच्या आवडीनुसार चित्रपटाची मांडणी होऊ लागली. सिनेमा सुपरहिट करण्यासाठी कथानकात मसाला घातला जाऊ लागला.
भारतीय सिनेमाच्या या वाटचालीत समांतर प्रवाहसुद्धा सामील झाला. प्रेक्षकांची सिनेमाकडून असलेली कलात्मक गरज या सिनेमाने पूर्ण केली. तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबर सिनेमा अगदी घरबसल्या बघण्याची सोय झाली. इतर कलाप्रकारांपेक्षा सिनेमाची लोकप्रियता निर्विवाद जास्त आहे कारण तो सहज आणि तुलनेने कमी दरात उपलब्ध होतो .मनोरंजनासाठी बहुसंख्य लोकांपुढे एकच पर्याय , तो म्हणजे सिनेमा.प्रेक्षक आपापल्या आकलनानुसार चित्रपट समजून घेतात. तो समजून घेण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं किंवा जाणीवपूर्वक आपली आकलनशक्ती वाढवावी अशी भावना भारतीयांमध्ये अजून रुजलेली नाही. त्यामुळे दोन घटका मनोरंजन या पलीकडे भारतीय प्रेक्षकांनी सिनेमा माध्यमाला गांभीर्याने घेतलेले नाही.
करोनाच्या काळात घरात कोंडल्या गेलेल्या लोकांना सिनेमाने दिलासा दिला. बाहेरील निराशाजनक वातावरणाचा घटकाभर विसर पडू देण्याची क्षमता सिनेमात होतीच. यु ट्युब, टी.व्ही चॅनल्स यांच्या बरोबरीनेच करोना काळापूर्वी रुजू झालेल्या ओटीटी माध्यमामुळे जगभरातील सिनेमा सहजपणे पाहण्याची सोय झाली. आणि या सोईचे सवयीत कधी रुपांतर झाले याची जाणीवच कोणाला झाली नाही. आता वातावरण निवळले असले तरीही ओटीटीवर प्रदर्शित होत असलेले सिनेमे पाहण्याची सवय सहजासहजी सुटणे कठीण आहे आणि याचा थेट फटका चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांना होताना दिसत आहे. करोनाची लाट ओसरल्या नंतर चित्रपटगृहे सुरु झाली मात्र तिथे जाऊन चित्रपट पाहण्याच्या मनस्थितीत प्रेक्षक नव्हते. सूर्यवंशी सारख्या बहुचर्चित चित्रपटाला यामुळे माफक यश मिळाले.
टीव्हीचा पडदा, टॅब, लॅपटॉपचं नव्हे तर मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर ओटीटीवर प्रदर्शित होत असलेले नवेकोरे सिनेमे पाहणारा प्रेक्षक वर्ग वाढला आणि मग निर्मात्यांनी सुद्धा आपला मोर्चा ओटीटी कडे वळवला. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करून निर्माण केलेले चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याऐवजी किमान आपण गुंतवलेली रक्कम वसूल होईल इतका व्यवहार करून ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. सेन्सॉरचे बंधन नसलेले आणि त्यामुळेच विषयांची विविधता असणारे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करता येत असल्याने अनेक मोठे दिग्दर्शकसुद्धा या माध्यमाकडे वळले.सिनेमा च्या बरोबरीनेच वेबसिरीज निर्माण करण्याकडे कल वाढला.
ओटीटीचा अजून एक परिणाम म्हणजे हिंदी , मराठी आणि हॉलीवूडच्या पलीकडचा दर्जेदार कंटेंट प्रेक्षकांना पहायला मिळू लागलाय .यात सर्वाधिक फायदा झाला तो दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचा! मल्याळम भाषेत निर्माण होत असलेले आशयघन सिनेमे आणि तमिळ, तेलुगू , कन्नड भाषेतील मनोरंजनाने परिपूर्ण असलेले चित्रपट सर्वत्र लोकप्रिय झाले. ‘द ग्रेट इंडिअन किचन’ , ‘जोजी’ , ‘कुंभलंगी नाईट’ सारख्या मल्याळम चित्रपटांना अगदी मराठी प्रेक्षकांनीसुद्धा पसंती दिली.वॉट्स अप वरून फिरलेल्या स्तुतीपर मेसेज मुळे या चित्रपटांची प्रसिद्धी झाली.
‘केजीएफ’ , ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटगृहात हाउसफुल चाललेले हे चित्रपट ओटीटी वर सुद्धा दिमाखात रुजू झाले. प्रेक्षकांना बांधून ठेवणारी कथानके, अगदी आपल्यातील वाटावेत असे ताकदीचे कलाकार ही दाक्षिणात्य चित्रपटांची काही वैशिष्ट्ये . दाक्षिणात्य चित्रपटांना स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग आधीपासूनच आहे. या चित्रपटांच्या जगभर असलेल्या शिस्तबद्ध वितरण व्यवस्थेमुळे बाहुबली सारखे प्रचंड बजेट असलेले चित्रपट तिथे निर्माण होऊ शकतात आणि यशस्वी सुद्धा. ओटीटी माध्यमाने या चित्रपटांना भारतातील इतर प्रदेशातील प्रेक्षक सहज उपलब्ध करून दिलाय. दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटांमुळे प्रेक्षक स्वाभाविकपणे या चित्रपटांकडे वळले. हिंदीतील त्याच त्याच पद्धतीच्या कथानाकांपेक्षा हा आशय लोकांना अधिक आवडू लागलाय.
दाक्षिणात्य चित्रपट उत्तम व्यवसाय करीत असताना हिंदी आणि मराठी चित्रपटांना व्यावसायिक यश का मिळत नाही ,हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. त्याच पहिलं कारण आशय आणि प्रसिद्धी हे आहे. जर चित्रपटाचे कथानक लक्षवेधी असेल तर प्रेक्षक चित्रपट पहायला जातातच हा आजवरचा अनुभव आहे. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ,दमदार कथानक असणारा, सुमधुर गीत संगीत असलेला हिंदी चित्रपट गेल्या अनेक दिवसात प्रदर्शित झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रेक्षकांच्या भावनेला हात घालणारा ‘काश्मीर फाईल्स’ हा अलीकडचा उत्तम व्यवसाय केलेला एकमेव सिनेमा . त्याची चर्चा तो सिनेमा म्हणून कसा आहे याहीपेक्षा त्यात हाताळलेल्या काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर अधिक झाली. मराठीत सुद्धा शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘पावनखिंड’, शेर शिवराय ‘ चित्रपटांना भरभरून प्रतिसाद मिळाला.
प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट त्याच्या प्रसिद्धी तंत्रामुळे सुपरहिट ठरला. चित्रपटाच्या दर्जापेक्षा तो एखाद्या विशिष्ट समूहाच्या अस्मितेचा पुरस्कार करणारा आहे, यावर त्याचे यश अवलंबून असल्याचे सिद्ध झाले. हा आपला सिनेमा ,तो त्यांचा सिनेमा अशी आजवर न झालेली वर्गवारी सिनेमा क्षेत्रात निर्माण केली गेली. या वर्गवारीमुळे काही चित्रपटांना आर्थिक यश मिळाले तरीही प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेल्या दुफळीचा फटका त्याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ला देखील बसला. हिंदी चित्रपटसृष्टीला आर्थिक आघाडीवर अपयश येत असताना एखाद्या प्रदर्शित होऊ घातलेल्या चित्रपटातील कलावंताने केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्या चित्रपटावर बंदी घालण्याचा नवीन ट्रेंड काही समूहांकडून सुरु केला गेलाय. संजय दत्तला अतिरेकी कारवायांमध्ये गुंतेलेला असण्याच्या आरोपावरून अटक झालेली असताना त्याच्या ‘खलनायक’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी काही संघटनांनी जोरदार निदर्शने केली होती. त्यावेळी किमान तो आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता.
आता मात्र आमीर खान, अक्षय कुमार यांच्या चित्रपटांवरील बॉयकॉट आपल्या समाजातील संयम आणि सहिष्णुता क्षीण होत चालल्याचे लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीने देशद्रोह केला असेल किंवा विघातक कृत्य केले असेल तर त्याला शिक्षा देण्यास आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे.समाज माध्यमावर येणारे संदेश वाचून जर आपण स्वतःच न्यायाधीशांची भूमिका घेणार असू तर ते आपल्या लोकशाही पद्धतीला घातक आहे. आपण उठसूट जर बॉयकॉटचे शस्त्र उगारणार असू तर चित्रपटसृष्टीचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. प्रेक्षकांनी कुठला सिनेमा पहावा, कुठला नाही हे ठरविण्याचा अधिकार केवळ प्रेक्षकांचाच आहे. कोणीतरी आग्रह केल्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमा सुपरहिट केल्याचे उदाहरण ऐकिवात नाही. तसेच कोणीतरी हा सिनेमा पाहू नका असे सांगितल्याने प्रेक्षकांनी त्या चित्रपटाकडे पाठ फिरवावी ही वृत्ती सांस्कृतिक जीवनाला पोषक ठरणारी नाही. चित्रपट व्यवसाय हा केवळ मोजके स्टार आणि निर्माते यांच्या पुरता मर्यादित नाही. पडद्यामागे काम करणारे असंख्य लोकांचे आयुष्य या व्यवसायावर अवलंबून आहे आणि चित्रपट हे लाखो लोकांच्या मनोरंजनाचे माध्यमही आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे मोठ्या पडद्यापासून ओटीटी पर्यंत झालेला सिनेमाचा प्रवास हा अपरीहार्य असला तरीही त्यातील आशय, त्याचे कलामूल्य आणि मनोरंजन करण्याची क्षमता कायम राहणार आहे. हे कलामाध्यम जिवंत ठेवणे ही जशी कलावंतांची जबाबदारी आहे तशीच ती आपल्या प्रेक्षकांची सुद्धा आहे.