ऐंशीच्या दशकात साऊथच्या प्रत्येक सिनेमात एक चेहरा हमखास दिसायचा, तो म्हणजे सिल्क स्मिताचा. पण हे चित्रपट आणि यातील भूमिकांमुळे सिल्क स्मिताला सॉफ्ट पॉर्न अॅक्ट्रेस, सेक्स सायरन, बिकनी गर्ल अशी विविध नावे मिळाली. सिल्कचा वाढदिवस नुकताच म्हणेजच 2 डिसेंबरला झाला. सिल्कचे खरे नाव विजयालक्ष्मी होते. घरच्यांनी अगदीच कमी वयात तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर सिल्कला सासरचा छळ सहन करावा लागला. या छळाला कंटाळून सिल्क एक दिवस घरून पळाली आणि पुढे तिने फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा निर्णय घेतला.
बालपणापासूनच सिल्कला सिने इंडस्ट्रीची ओढ होती. सासरहून पळून आलेल्या सिल्कने कसाबसा या इंडस्ट्रीत प्रवेश मिळवला. सुरुवातीला सिल्कने सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून काम केले. शूटिंगदरम्यान सिल्क अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून स्मिताही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होती. 1978 मध्ये ‘बेदी’ या कानडी सिनेमात तिला पहिला ब्रेक मिळाला. पुढच्याच वर्षी ‘वांडीचक्रम’ या सिनेमात तिला मोठी संधी मिळाली. या सिनेमात तिने स्मिताचे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेने तिला ‘सिल्क स्मिता’ हे नाव मिळाले.
23 सप्टेंबर 1996 ला सिल्क स्मिता नावाचे वादळ कायमचे शांत झाले होते. तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिने आत्महत्या केली, असे काही लोक मानतात. तर काहींच्या मते, तिच्या मृत्यूमागे वेगळेच रहस्य आहे. आज इतक्या वर्षांनंतरही सिल्म स्मिताचा मृत्यूचे गूढ कायम आहे. सिल्कने निधनाच्याआधी अनेकवेळा दाक्षिणात्य सुपरस्टार रवीचंद्रनला फोन केला होता. त्याच्यासोबत सिल्कला काय बोलायचे होते हे कधीच कोणाला कळले नाही. रवीचंद्रनने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्या दिवशी सिल्क मला सतत फोन करत होती. नेटवर्क खराब असल्याने आमचे काहीही बोलणे झाले नाही. मला वाटले की, ती नेहमी सारखीच मला फोन करत असेल. पण सिल्कने त्या दिवशीच आत्महत्या केली हे कळल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला होता.